खेड; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील ग्रामीण भागात आज (दि.८) पावसाची संततधार सुरूच आहे. जगबुडी नदी ७.५ मीटर इतक्या धोका पातळीवरून वाहत आहे. नदी किनारी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या हलक्या ते मुसळधार सरीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तालुक्यात खेड शहरासह ग्रामीण भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने धुवाँधार हजेरी लावली आहे. तालुक्यातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

शहरातील नदी किनार्‍यालगतचा बंदर मार्ग पाण्याखाली गेला आहे. जगबुडी नदी किनार्‍यावरील शहरातील मटण, मच्छी मार्केटला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास खेड बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने बाजारपेठेतील व नदी किनार्‍यावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या चोवीस तासांत खेडमध्ये १०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ८ रोजी पर्यंत १७९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नारिंगी नदीला आलेल्या पुराचे पाणी खेड-दापोली मार्गावर सुर्वे इंजिनिअरिंग या ठिकाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

हेही वाचलंत का ? 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here