रायगड; पुढारी वृत्तसेवा : महाड तालुक्यातील फौजी आंबवडे गावाकडे निघालेली तळेगाव फौजी अंबावडे ही एसटी मुख्य रस्त्यावरून घसरल्याची दुर्घटना घडली. मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे आज (दि.८) दुपारी एक वाजताच्या सुमारास बसला तांबडी कोंड एसटी स्टॉपजवळ ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याने सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

याबाबत महाड एसटी आगार व्यवस्थापनाकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महाड आगारातून फौजी आंबवडे गावाकडे तळेगाव फौजी अंबावडे ही एसटी (क्र. एमएच ०६, एस ८१८0) निघाली. दुपारी एक वाजताच्या सुमारास तांबडी कोंड एसटी स्टॉपजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देत असताना चालकाचा ताबा सुटल्याने मुख्य रस्त्यावरून गाडी घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच गाडीवर ताबा मिळवल्याने गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.

एसटीमध्ये महाडपासून फौजी आंबवडे करिता वीस प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती वाहकाने दिली. गाडीचा चालक सिद्धेश्वर मधुकर उमाप यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल गाडीतील प्रवाशांनी त्यांचे आभार मानले.

या घटनेचे वृत्त समजताच महाड आगरातील रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांची अंबवडे येथे जाण्याची व्यवस्था केली. अशी माहिती आगार व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाड पोलादपूर परिसरात पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यालगत असलेल्या साईडपट्ट्या चिखलमय झाल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या दुरूस्ती आणि टायर बाबतही एसटी प्रशासनाने वारंवार देखरेख करून काळजी घेण्यात यावी. अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here