रत्नागिरी; भालचंद्र नाचणकर :  रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या मागासवर्गीय आरक्षणाच्या भीतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेना वगळता इतर राजकीय पक्ष चिंताग्रस्त आहेत. मुख्यमंत्री गटाकडे या आरक्षणातील महिला आणि पुरुष हे दोन्ही सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री गटाची शिवसेना निश्‍चिंत आहे.

वर्षभरापासून अनेक नगर परिषदांमधील नगरसेवक आणि नगराध्यक्षांची 5 वर्षांची मुदत संपलेली आहे. आता या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी नगर परिषदेतील नगरसेवकांची मुदत गेल्या 27 डिसेंबर रोजी संपली आहे. आता तर इतर मागासप्रवर्ग (ओबीसी) आरक्षणासह इतरही आरक्षणाच्या सोडती काढल्या गेल्या आहेत. त्यानंतर नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडती नगरविकास मंत्रालयाकडून काढल्या जाणार आहेत.

नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडती संदर्भात रत्नागिरीतील मुख्यमंत्री गटाची शिवसेना वगळता इतर राजकीय पक्षांमध्ये चिंता आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे मागासवर्गीय प्रवर्गाचे आरक्षण पडलेले नाही. त्यामुळे हे आरक्षण पडले तर सक्षम उमेदवार कसा द्यायचा? ही चिंता आहे.

रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात सामील झाले आहेत. या गटाकडे या आरक्षणातील सक्षम उमेदवार उपलब्ध आहे. पुरुष आरक्षण पडल्यास विजय खेडेकर हे सक्षम उमेदवार आहेत. सामाजिक क्षेत्रातील कामात ते आघाडीवर असतात. स्वच्छ प्रतिमा आणि दांडगा जनसंपर्क असलेले हे संभाव्य उमेदवार जनसंपर्कातही आघाडीवर आहेत. श्री. भैरी देवस्थानाच्या समितीवरही ते गेले अनेक महिन्यांपासून कार्यरत आहेत.

मागासवर्गीय आरक्षणातील महिला आरक्षण पडल्यास त्यांच्या सौभाग्यवती वैभवी खेडेकर प्रमुख दावेदार असणार आहेत. माजी नगराध्यक्षा आणि समाजकल्याण समिती सभापती म्हणून त्यांचे काम उल्लेखनीय आहे. सुशिक्षित आणि तितक्याच आक्रमक नगरसेविका म्हणून त्यांनी गेल्या 5 वर्षांत आपल्या कार्याची चमक दाखवून दिली आहे.

आ. उदय सामंत यांची खंदे समर्थक म्हणूनही या खेडेकर दाम्पत्याची ओळख आहे. इतर राजकीय पक्षांकडे या दोन्ही उमेदवारांच्या तुल्यबळ असा अपेक्षित उमेदवार दिसून येत नाहीत. आतापर्यंत गेल्या पाच ते सहा टर्ममध्ये नगराध्यक्षपदासाठी मागासवर्गीय आरक्षण वगळता इतर सर्व प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत निघालेली आहे. त्यामुळे यावेळी नगराध्यक्षपदासाठी हे आरक्षण मागासवर्गीय प्रवर्गासाठी पडले तर काय करायचे ? हा प्रश्‍न इतर राजकीय पक्षांना सतावत आहे.

आरक्षण कोणतेही पडू दे… नो टेन्शन
रत्नागिरीचे आमदार उदय सामंत ज्या मुख्यमंत्री गटाच्या शिवसेनेत आहेत, त्या शिवसेनेत सर्वच प्रवर्गातील प्रभावी उमेदवार आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी कोणतेही आरक्षण पडले तरी हरकत नाही, अशी भावना या शिवसेना गटाची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here