
सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : कीटकनाशक पिऊन शिक्षकाने आत्महत्या केल्याचा प्रकार सावंतवाडी शहरात घडला. दशरथ बापू सावंत (वय 52) असे त्यांचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी 2 वा. च्या सुमारास खासकीलवाडा येथील कॉसमॉस इमारतीत घडली. तृणनाशक पिऊन ते आपल्या इमारतीच्या टेरेसवर गेले होते. त्या ठिकाणी ते अत्यवस्थ आढळून आले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मी आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. त्यामुळे कोणालाही जबाबदार धरू नये, अशी सुसाईड नोट लिहून ठेवत सावंत यांनी आत्महत्या केली आहे. दशरथ बापू सावंत (मूळ रा.कारिवडे, सध्या रा. न्यू खासकीलवाडा, सावंतवाडी) असे त्यांचे नाव आहे. सावंत हे एकटेच घरी होते. तणनाशक पिऊन ते आपल्या फ्लॅटमधून इमारतीच्या टेरेसवर गेले. त्या ठिकाणी ते शेजार्यांना अत्यवस्थ आढळून आले. शेजार्यांनी त्यांना तत्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
सावंत हे शिरशिंगे शाळा नं.1 येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी काही कारणास्तव गेले महिनाभर सुट्टी घेतली होती. मागील दहा दिवसांपासून त्यांचे मानसिक आरोग्य ढासळले होते. त्यांच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचारही सुरू होते, अशीही माहिती सावंतवाडी पोलिसांकडून देण्यात आली. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांची पत्नीही शिक्षिका असून ती अणसूर ता.वेंगुर्ला येथे कार्यरत आहेत. त्या शाळेत गेल्या होत्या. याच दरम्यान त्यांनी हा प्रकार केला. मात्र त्यांच्याकडे सुसाईड नोट आढळली आहे.
आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये किंवा कोणालाही त्रास देऊ नये, असे म्हटले आहे. आजारपणाला कंटाळून त्यांनी हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अधिक तपास सावंतवाडी पोलिस करीत आहेत. त्यांच्या मृत्यूने कारिवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.