
वैभववाडी; पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसामुळे करूळ घाटातील संरक्षक भिंत कोसळल्याने या घाटमार्गातील वाहतूक ठप्प झाली आहे. संरक्षक कठडा कोसळल्याने रस्त्याचे झालेले नुकसान पहाता दुरुस्तीसाठी किमान आठ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. साहजिकच पुढील किमान आठ दिवस हा घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद राहण्याची शक्यता आहे.
रविवारी रात्री 10 वा.च्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे घाटात दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर पोलिसांनी ही वाहतूक मार्गावरील संपूर्ण वाहतूक पोलिसांनी फोंडाघाट व भुईबावडा घाटमार्गे वळविली आहे. गेले दोन- तीन दिवस वैभववाडी तालुक्यात जोरदार पावसाची संततधार सुरू आहे. त्याचा सर्वांत जास्त फटका करूळ घाट मार्गाला बसला आहे. करूळ घाट मार्गात पायरी घाटानजीक दरीकडील बाजूची संरक्षक भिंत कोसळली आहे.
भिंत कोसळल्याने साईडपट्टीचा भागही दरीत कोसळला आहे. करूळ चेक नाक्यावर ड्युटीवर असलेल्या पोलिस व राष्ट्रीय महामार्गच्या अधिकार्यांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेल्या ठिकाणी बॅरल व फलक लावण्यात आला आहे. तसेच खबरदारी म्हणून या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट, आंबोली घाटमार्गे वळविण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरहून येणारी वाहने भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कोसळलेल्या ठिकाणी आणखी घाटमार्ग खचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महामार्ग प्राधिकरणचे अभियंता करणार पहाणी
वैभववाडी तहसीलदार रामदास झळके, पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी घाटमार्गाची पहाणी केली आहे. खबरदारी म्हणून पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता प्रत्यक्ष पाहणी करून घाटातील वाहतूक बंदच करावी किंवा एकेरी वाहतूक सुरू करावी, याबाबतचा निर्णय घेतील, असे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले आहे.