
कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : झाराप येथे जनरल स्टोअर्स आणि हॉटेल अशा दोन दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली. हॉटेलमधील रोख 750 रुपये आणि जनरल स्टोअर्समधील रोख 8 हजार रुपये व चार एटीएम कार्ड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार कुडाळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
झाराप तिठ्यापासून काही अंतरावर रेल्वेस्टेशन रस्त्यालगत झाराप सामंतवाडी येथे महादेव सहदेव होडावडेकर यांच्या मालकीच्या एका गाळ्यात सिद्धेश पांडुरंग आवळेगावकर यांचे जनरल स्टोअर्स आहे. तर होडावडेकरही तेथेच हॉटेल चालवितात. रविवारी रात्री दोन्ही व्यावसायिकांनी दुकाने बंद करून घरी गेले. सोमवारी सकाळी हॉटेल व गाळे मालक श्री.होडावडेकर यांना त्यांच्या हॉटेलचे शटरचे कुलूप तोडलेले दिसले.
त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन खात्री केली असता काऊंटरमधील रोख 750 रूपये रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. तसेच लगतच्या आवळेगावकर यांच्या जनरल स्टोअर्सच्या शटरचेही कुलूप ातांनी तोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर होडावडेकर यांनी आवळेगावकर यांना कल्पना दिली. आवळेगावकर यांनी दुकानात जाऊन खात्री केली असता, शटरचे कुलूप चोरट्यांनी तोडलेले तसेच आतील ड्रॉव्हरमधील रोख 8 हजार रूपये आणि विविध बॅकांची चार एटीएम कार्ड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली तर पोहेकॉ. एस.एन.टाकेकर, हनुमंत धोत्रे यांनी पंचनामा केला. याबाबतची तक्रार सिद्धेश आवळेगावकर यांनी पोलिस ठाण्यात दिली.