रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : पावसाने कोकणात पुन्हा एकदा जोर धरला आ हे. पुढील चार दिवस हवामान खात्याने कोकणातील सर्व जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा हवामान खात्याने दिला असून, कोकणातील काही भागात पूरजन्यस्थिीतीची शक्यता आहे. संभाव्य पूरसदृश भागात खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

सोमवारी 182 मि.मी.च्या सरासरीने मारा करणार्‍या पावसाचा जोर मंगळवारी काहीसा ओसरलेला होता. मात्र, सातत्य राखल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण होऊन भितीचे वातावरण आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी मंगळवारीही पाच नद्या इशारा पातळीवर वाहत असल्याने परिसरातील गावांना पूरसदृश स्थितीचा समाना करावा लागत होता. मात्र, पाऊस ओसरल्याने स्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. तरीही किनारी गावासंह नदी किनारी गावांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल्या. सर्वाधिक पाऊस मंगळवारी लांजा तालुक्यात झाला. रात्री पासून जोर धरलेल्या पावसाने सकाळीही सातत्य ठेवल्याने येथील काजळी नदी च्या जलस्तरात वाढ झाली. काजळी नदी इशारा पातळीच्यावर वाहू लागल्याने आसपासच्या गावांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली.

चांदेराई बाजारपेठेत 29 तास पाणी

पावसाने मंगळवारी दुपारनंतर रत्नागिरी तालुक्यात काहीशी उसंत घेतली असली तरी मागील 24 तासात पडलेल्या धुवाँधार पावसामुळे काजळी नदीला आलेला पूर ओसरला आहे. चांदेराई बाजारपेठेत तब्बल 29 तासानंतर पाणी ओसरले असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीनेही इशारा पातळी ओलांडल्याने तसेच बावनदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने येथील गावातील अनेक भागातील भात शेती पाण्याखाली आहे. मात्र, मंगळवारी पावसाचा जोर ओसरल्याने येथील स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे.

लांजात विक्रमी पाऊस

मंगळवारी 137 मि.मी. सरासरीने 1240 मि.मी. एकूण पाऊस झाला. सोमवारी जवळपास बहुतांश तालुक्यात पावसाने 200 मि.मी.ची मजल गाठली होेती. मात्र, मंगळवारी सर्वाधिक विक्रमी पाऊस लांजा तालुक्यात नोंदविला. लांजा तालुक्यात 334 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे काजळी नदीचे जलपात्र इशारा पातळीकडे झेपावले. पातळीत वाढ झााल्याने परिसरातील गावांना सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here