मालवण/ चौके; पुढारी वृत्तसेवा :  कुणकवळे-कुपेरीघाटी येथील तीव्र उतार वळणावर चिरे वाहतूक करणार्‍या ट्रकला अपघात झाला. तीव्र उतार वळणावर समोरून येणार्‍या ट्रकने हुलकावणी दिल्याने व चिर्‍यांनी भरलेल्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक आंब्याच्या व इतर झाडांना जोरदार धडकला. यात चालक अर्जुन ईश्‍वर नाईकप्पागोल (वय 30, रा. यरगनवी, ता. सौंदत्ती, जि. बेळगाव) याचा जागीच मृत्यू झाला, तर क्लिनरच्या कानाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी दुपारी तीन वाजता ही दुर्घटना घडली.

अर्जुन नाईकप्पागोल हा चौके येथून चिरे भरून कर्नाटक येथे जात होता. या अपघातात ट्रकचा चक्‍काचूर झाला. अपघातानंतर चालकाचा मृतदेह बराच वेळ ट्रकमध्येच अडकून होता. घटनास्थळी चौके व कुणकवळे ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. चिर्‍यांनी भरलेला ट्रक हमालांनी खाली केला.

त्यानंतर दोन जेसीबीच्या, मनुष्यबळाच्या सहायाने आंब्याच्या झाडाच्या व इतर झाडाच्या आणि ट्रकच्या मध्ये अडकलेल्या चालकांला बाहेर काढण्यात आले आणि रूग्णवाहिकेने मालवण येथे नेण्यात आले. ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी मालवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय यादव, इतर पोलिस कर्मचारी, ट्राफिक पोलिस, स्थानिक ग्रामस्थ, चौके ग्रामस्थ, खाण व्यावसायिक, खाण कामगार, सरपंच, पोलिस, नागरिकांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here