गुहागर/रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण किनारपट्टी भागात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या इशार्‍यामध्ये मच्छिमारांना 11 ऑगस्टपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त हवामान विषयक संदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आगामी दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. बुधवारी पावसाचा जोर काहीसा ओसरलेला राहिला.दरम्यान, गुरूवारी रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. गुहागर तालुक्यात तीन दिवस मुसळधार कोसळणार्‍या पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. साखरीआगर येथे घराची पडवी, कुडली येथे शाळेची भिंत, कोतळूक येथे गोठा पूर्णत: कोसळून नुकसान झाले आहे.

बुधवारी जिल्ह्यात संपलेल्या 24 तासात 65.68 मि.मी.च्या सरासरीने 591 मि.मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी लांजा तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली होती. गेले दोन दिवस लांजा तालुक्यात 300 ते 350 मि.मी. पाऊस झाला. बुधवारी मात्र पावसाचा जोर ओसरलेला राहिला. काही भगात पावसाने उसंत घेतली. बुधवारी लांजा तालुक्यात 46.50 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे गेले दोन दिवस काजळी नदीच्या पाणी पातळीत झालेली वाढ कमी झाली. त्यामुळे येथे उद्वलेली पूरस्थिती ओसरण्यास मदत झाली.

खेड आणि चिपळूण या दोन तालुक्यात मात्र बुधवारी पावसाने शंभरी गाठली. त्यामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदी अद्यापही धोका पातळीच्या वर वाहत आहे तर चिपळूणातही वाशिष्ठीचे पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र, सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने येथील पूरस्थिती नियंत्रणात आहे. राजापूर तालुक्यात कोदवली नदीनेही इशारा पातळी गाठली आहे तर अन्य नद्यांतील जलस्तर ओसरलेला आहे.

मंडणगड तालुक्यात 77. 60 मि.मी. दापोली 70, गुहागर 64.30, संगमेश्वर 39.20, रत्नागिरी 37.10, लांजा 46. 50, राजापूर तालुक्यात 59.30 मि. मी . पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 2213.94 मि.मी.च्या सरासरीने पावसाने एकूण 20 हजारापर्यंत मजल मारली आहे. गतवर्षी याच कालावधीत पावसाने 25 हजाराचा एकूण टप्पा पूर्ण केला होता. गेले दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने गारठ्यात वाढ झाली असून तापमानही 27 अंश सेल्सियसपर्यंत स्थिरावले आहे.

सध्या कोकणात मोसमी पावसाचा दुसर्‍या टप्पा सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. तसेच अनेक नद्यांनाच्या परिसरात पूरस्थिती उद्भवली होती. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दोन दिवस कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेटने महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टी भागात हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here