
देवगड; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने टेंबवली कालवी येथे एका घरामध्ये छापा टाकून सुमारे 63 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. याप्रकरणी संशयित संतोष भास्कर पारकर(वय 56, रा. टेंबवली) याला ताब्यात घेतले. ही कारवाई 10 ऑगस्ट रोजी दुपारी 1.35 वाजता केली.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला देवगड तालुक्यात एक व्यक्ती गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, शरद शेटे, पो.हवालदार कृष्णा केसरकर, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, संकेत खाडये, अमित तेली, रवी इंगळे, श्वान हँडलर परब, कांदळगावकर, फर्नांडीस व डॉग ब्राओ यांच्या पथकाने 10 ऑगस्ट रोजी टेंबवली कालवी येथे गांजा विक्री करीत असलेल्या घरात छापा टाकला व 2 किलो 158 ग्रॅम वजनाचा सुमारे 63 हजार रूपये किंमतीचा गांजा जप्त केला. संशयित म्हणून संतोष पारकर याला ताब्यात घेतले आहे. स्वत:च्या फायद्याकरिता गांजा विक्री करण्याचा उद्देशाने मिळाल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाईची प्रक्रिया देवगड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.