वैभववाडी; पुढारी वृत्तसेवा : अंगणात बांधलेल्या तारेवर कपडे वाळत घालताना विजेचा शॉक बसून सांगुळवाडी-बौध्दवाडी येथील उदाती यशवंत जाधव (65) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 8.45 वा. सुमारास सांगुळवाडी -बौध्दवाडी येथे घडली.

उदाती जाधव हे घरासमोरील अंगणात बांधलेल्या तारेवर कपडे वाळत घालत होते. यावेळी त्यांना या तारेतून विद्युत शॉक बसून ते तारेला तसेच चिकटून होते. दरम्यान जळच असलेल्या कुत्रा जोराजोरात भूंकू लागला म्हणून त्यांच्या पत्नी घरातून बाहेर आल्या. त्यांना पती तारेला चिकटलेले दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारचे लोक आले. त्यांनी सुकी लाकडी काठी लावल्यानंतर ते खाली पडले. त्यांना तातडीने वैभववाडी येथे खाजगी दवाखान्यात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. वीज अधिकार्‍यांनीही घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

मयत उदाती जाधव हे मुंबई महानगर पालिकेतून सेवानिवृत्त झाले होते. सांगुळवाडी बौध्दविकास मंडळाचे कोषाध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. शेती, बागकाम व सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. सांगुळवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणीत त्यांचे भरीव योगदान आहे. सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे जाधव यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे,सुना, नातवंडे, भाऊ, भावजय, पुतणे,पुतण्या असा मोठा परिवार आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here