
गुहागर; पुढारी वृत्तसेवा : गुहागरमध्ये चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चोरांनी दोन रात्रीत 6 ठिकाणी डल्ला मारला आहे. यामध्ये 4 मंदिरांतील दानपेट्या, तर एका ठिकाणी गॅरेज आणि घरफोडी अशा एकूण 6 ठिकाणी चोरी झाली आहे. ही घटना बुधवार आणि गुरुवारी सलग दोन दिवस घडली.
यामध्ये आरे येथील श्री राम मंदिर, श्री दत्त मंदिर वरवेली, मराठवाडी येथील श्री हसालाई देवी मंदिर व पालशेत येथील श्री गणेश मंदिर अशा चार ठिकाणी चोरट्यांनी दानपेट्या फोडल्या. सर्व मंदिरांतील गाभार्यांचे टाळे फोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. यामध्ये हसालाई मंदिरात असेलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे व्यवस्थित दिसत नाहीत. या घटना घडल्यानंतर दुसर्या दिवशी गुरुवार, दि. 11 ऑगस्ट रोजी चोरट्यांनी पुन्हा गुहागरातील शृंगारतळी वेळंब येथे मंगेश प्रभाकर जाधव यांचे गॅरेज फोडले.
याबाबत मंगेश यांनी गुहागर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. रक्षाबंधनसाठी ते मुंबई येथे गेले होते, ते वेळंब येथे भाड्याच्या खोलीत राहतात. खोलीच्या बाजूला दुसर्या खोलीमध्ये त्यांचे गॅरेज आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये काम करणारे सूर्यकांत नवलकर हे गुरुवारी सायंकाळी गॅरेज बंद करून घरी गेले होते. मंगेश जाधव हे 12 ऑगस्ट रोजी मुंबईहून शृंगारतळी येथे आले असता त्यांना आपल्या खोलीचा दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटलेला दिसला. आत जाऊन पाहिले तर घरातील सिलिंडर तसेच ब्लूटूथ स्पीकर चोरीस गेला होता. त्यांनी गॅरेजमध्ये जाऊन पाहिले असता. तिथेही खोलीचा कडी-कोयंडा उचकटून गाडीच्या दोन बॅटर्या चोरीस गेल्याचे दिसून आले. यात एकूण 9,500 रुपयांच्या मालाची चोरी झाली आहे. याप्रकरणी जाधव यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.