आंबोली; निर्णय राऊत :  जुलै महिन्यात पावसाने काही दिवस आंबोली परिसरात विश्रांती घेतली होती. मात्र, गेले आठ दिवस अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे आंबोलीत पावसाने दोनशे इंचाचा टप्पा अवघ्या दोन महिन्यांतच पार केला. शुक्रवार, ता. 12 पर्यंत सुमारे 215 इंच (5461 मि.मी.) पेक्षा अधिक पावसाची नोंद येथे झाली. तर गेल्या आठ दिवसात विक्रमी 47 इंचहून जास्त पावसाची नोंद येथे करण्यात आली आहे. पाऊस असाच कोसळत राहिल्यास यावर्षीही पाऊस 400 इंचाचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

आंबोलीतील पाऊस नेहमीच सारखा नसतो. पावसाची हलका, मध्यम, निवांत, जोरदार, अतिजोरदार, मुसळधार, अतिमुसळधार, अतिवृष्टी सदृश्य, अतिवृष्टी, ढगफुुटीसदृश्य आदी अशी बरीच रूपे जणू येथे पहायला मिळतात. पावसासोबत प्रचंड गारवा, सोसाट्याचा वारा, वादळी वारे, घनदात धुके येथे नेहमी पाहायला मिळतात. सोबत पावसामुळे येथे स्वर्गीय देखावेच नजरेस पडतात. त्यामुळे येथील पाऊस सर्वांनाच आकर्षित करतो. तसेच पावसाचा आक्राळ विक्राळ जोरसुद्धा अंगावर काठा उभा करणारा असतो. फेसाळणारे धबधबे, हिव्यागार आणि धुक्यांनी भरलेल्या दर्‍या, निसर्गाची नवलाई, असा हा आंबोली परिसरातील पाऊस नेहमी रोमांचित आणि आव्हानात्मक असतो. त्यामुळे अंसख्य पर्यटक वर्षा पर्यटनाकरिता आंबोली येत मनसोक्त आनंद लूटत असतात.

आंबोली परिसरात 2019 पासून पावसाळ्यात पावसाची विक्रमी नोंद होत आहे. देशातील सर्वात जास्त पाऊस कोसळणारे ठिकाण म्हणून ‘चेरापुंजी’ ची ओळख जरी असली, तरी दोन वर्षांपूर्वी आंबोलीत जागतीक स्तरावरील सर्वात जास्त पावसाची नोंद झाली होती. यंदाही आंबोलीत पावसाने नवा विक्रम करत 216 इंच (5461 मि.मी.) 1 जून ते 12 ऑगस्ट या कालावधित नोंद झाली आहे. अद्याप पावसाचे पूर्ण दोन महिने कालावधी शिल्लक असून 400 इंच हून अधिक पाऊसाची नोंद येथे होण्याची शक्यता आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here