
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्याची वारंवार दुरवस्था होते. यावर आता तोडगा निघणार आहे. रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी राज्य नगरोत्थान समितीने 100 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने ही सफलता मिळाली आहे. त्यामुळे नगर परिषदेचा खड्डे भरण्यावर होणारा खर्च आता वाचणार आहे.
काँक्रिटच्या रस्त्यावर देखभाल दुरुस्तीसाठी किमान 30 वर्षे तरी काहीच खर्च करावा लागत नाही. रत्नागिरी शहरात सुमारे 110 कि.मी.चे सर्व रस्ते असून, 80 फुटी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर सर्वच वाहनांची वाहतूक असते. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळेही चांगले रस्ते खराब होतात. अवजड वाहनांचीसुद्धा याच मुख्य रस्त्यावर रेलचेल असते. त्यात उतारांचे रस्ते असल्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर वारंवार खड्डे पडतात. दरवर्षी हे खड्डे बुजवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेला लाखो रूपये खर्च करावे लागतात.
शहरातील हा मुख्य रस्ता सर्वांच्याच नजरेत येत असल्याने त्यावर खड्डे पडले की ओरड सुरू होते. त्यामुळे रस्ता काँक्रीटचा झाल्यानंतर ही ओरड संपुष्टात येणार आहे. पर्यायाने रस्ता झाल्यानंतर त्यावेळच्या सत्ताधार्यांच्या विरोधातील नेत्यांना खराब रस्त्यांचा मुद्दा सोडून द्यावा लागणार आहे. राज्य नगरोत्थान समितीने मंजूर केलेल्या 100 कोटी रुपयांतून किमान 9 ते 10 कि.मी.चा रस्ता काँक्रीटचा होणार आहे. तब्बल 30 वर्षे अशा रस्त्यांच्या दुरुस्तीला कोणताच खर्च करावा लागणार नाही. रस्ते चकाचक होणार असल्याने येथील नागरिकांतूनही समाधान व्यक्त होत आहे. रत्नागिरी नगर परिषदेचे दरवर्षीचे खड्डे भरण्यासाठी खर्च होणारे लाखो रुपये वाचणार आहेत. राज्य समितीकडून 100 कोटी मंजूर झाल्यानंतर ना. उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.