रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : काही शाळांमध्ये निकृष्ट पोषण आहार आढळल्यानंतर संबंधित ठेकेदाराला नोटीसा बजावल्या आहेत. तीन नोटीस दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द केला जाणार आहे. त्याचबरोबर या संपूर्ण निविदा प्रकियेची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली.

या संदर्भात गुरुवारी पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, येथील शिर्के प्रशाला तसेच दामले हायस्कूलमध्ये पोषण आहारात अनियमितता आढळली. इतकेच नव्हे तर कच्चा पोषण आहार दिला गेला. सलग तिसर्‍या दिवशीही पोषण आहार व्यवस्थित आला नव्हता. पाण्यासारखी आमटी आणि मऊ भात विद्यार्थ्यांना दिला. शाळांकडूनही तक्रारी अहवाल मागविले आहेत. त्यामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असेल तर योग्य निर्णय घेण्यात येईल. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावल्याचे जाखड यांनी सांगितले.

टेंडर मिळालेल्या तिन्ही संस्था जिल्ह्याबाहेरील असून यामध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळाले नाही, डिपॉझिटची रक्कम अधिक असल्याने स्थानिक बचतगटाला ही रक्कम भरता आली नाही. परंतु, त्यानंतर डिपॉझिटची रक्कम कमी केल्याची माहिती पुढे आली आहे. या निविदा विभागू विभागून दिल्या आहेत. दरम्यान, या संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व डॉ. जाखड यांनी जिल्हा सर्वशिक्षण विभाग व नगर परिषदेला देणार असल्याचे सांगितले.

यापूर्वी स्थानिक बचतगटाच्या महिला शाळांमधून जाऊन अन्न शिजवून गरमा गरम सकस आहार मुलांना देत होत्या. मात्र नियमावली बदलल्यानंतर यात अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी शाळांमधून आल्या आहेत. अनेक विद्यार्थी आता घरातूनच डबे घेऊन येत असून, निकृष्ट पोषण आहार खाण्यास नकार देत आहेत. या पार्श्वभूमीवर पोषण आहार विषयात आपण लक्ष घातल्याचेही दोन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here