
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील मुरुगवाडा येथील पांढरा समुद्र येथे पोहण्यासाठी गेलेला तरुण पाण्यात बेपत्ता झाला असून या बाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे. ही घटना सोमवारी 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वा. सुमारास घडली, यातील बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात येत आहे. या दुर्घटनेतून अन्य दोघांना वाचवण्यात यश आले आहे.
अमिर मोहम्मद खान (22, मूळ रा. बिहार, सध्या रा. फिनोलेक्स कॉलनी, शेजारी रत्नागिरी) असे बुडून बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. या बाबत त्याचा मित्र अर्जुन राजेंद्र रामकुमार (19, मूळ रा. बिहार, सध्या रा. फिनोलेक्स कॉलनी शेजारी, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, अमिर मोहम्मद खान, अर्जुन राजेंद्र रामकुमार आणि अमनराम हे तिघे मित्र असून ते फिनोलेक्स कॉलनी शेजारील कोस्ट गार्डच्या इमारतीचे काम करत आहेत. सोमवारी सुट्टी असल्याने सायंकाळी 4 वा. ते तिघेही पांढरा समुद्र येथे फिरण्यासाठी गेले होते. काही वेळाने ते समुद्राच्या पाण्यात खेळे लागले असताना अमिर मोहम्मद खान पाण्यात ओढला गेला. तो पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच अर्जुन आणि अमनराम या दोघांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. परंतु, ते दोघेही पाण्यात बुडू लागल्याचे तेथील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी पाण्यात जाऊन या दोघांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, त्यांच्यापैकी अमिर मोहम्मद खान पाण्यात बेपत्ता झाला. मंगळवारी सायंकाळपर्यंत अमिरचा शोध लागलेला नव्हता. या बाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.