रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : भविष्यात कोकणातील सुशिक्षित तरुण किंवा तरुणी बेरोजगार राहणार नाही, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर प्रथमच मंत्री उदय सामंत रविवारी रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर आले असताना त्यांनी या बाबत आश्वस्त केले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मला उद्योगखाते मिळाले. त्यामुळे निश्चितच कोकणाचा विकास कसा होईल, यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

जिल्ह्यात पाऊल ठेवल्यानंतर त्यांना उद्योगखाते दिल्याचे जाहीर झाले. जिल्ह्यात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. खेडपासून चिपळूण, संगमेश्वर आदी भागांमध्ये त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जल्लोषात आणि मोठ्या उत्साहाने स्वागत केले. त्यानंतर सामंत रात्री उशिरा रत्नागिरीत दाखल झाले. सोबत श्रीमंत संभाजीराजे होते. शहरातील मारुती मंदिर सर्कल येथील शिवसृष्टी आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिचिन्हाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला.

ना. सामंत यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी जंगी तयार केली होती. भलामोठा पुष्पहार तयार करून तो स्क्रीनला लटकवून ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे या हाराच्या मध्यभागी साहेब असे फुलांनी लिहिले होते. ढोल-ताशे आदींचा चौकात नाद घुमत होता; परंतु, त्यांच्या स्वागताचे एवढे कार्यक्रम झाले की, या रत्नागिरीतील नियोजित कार्यक्रमाला वेळेत त्यांना येता आले नाही. त्यामुळे रात्री उशिरा हा कार्यक्रम झाला तरी रात्री दणक्यात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सामंत म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षे आहे. 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वत्र भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले. माजी सैनिकांनी जे संरक्षण आपल्याला दिले त्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत. हा भलामोठा पुष्पहार घालून आपण उद्या त्यांचा सत्कार करू या. आपले सगळ्यांचे प्रेम आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच माझ्यासोबत राहू देत. रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मला उद्योगखाते मिळाले. तुम्हाला मी शब्द देतो की, भविष्यात कोकणातील एकही तरुण किंवा तरुणी बेरोजगार राहणार नाही.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लवकरच रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ताकद दाखवून द्यावी, असे आवाहनही ना. सामंत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here