सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : भारताच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणासाठी जिल्ह्याच्या दौर्‍यामध्ये आलेले मंत्री दीपक केसरकर यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांची कणकवली येथे भेट घेतली.केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनीही निमंत्रण दिले तर त्यांचीही भेट घेऊ, असे ना.केसरकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचेही मार्गदर्शन घेऊ ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. विकासासाठी सगळे मतभेद बाजूला ठेवून भेटीचे निमंत्रण आले तर त्यांना भेटू, असे केसरकर म्हणाले.

प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षण हा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील जाणकाराशी चर्चा करून कौशल्य विकास, रोजगार अभिमुख आणि जीवनमान उंचवणारे दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून प्रयत्न केला जाईल,अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शिक्षण विभागातील कोणताही घोटाळा सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

शिक्षण खाते मोठी शक्ती आहे. शिक्षक देशाची भावी पिढी निर्माण करत असतात.शिक्षक आणि विद्यार्थी यांची सांगड घालून दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे त्यासाठी पूर्वीचे शिक्षणमंत्री, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून आवश्यक असल्यास पॉलिसी तयार केली जाईल. व्यावसायिक व कौशल्य विकास शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. त्याला आध्यात्मिक गरज आहे का ती तपासली जाईल. मराठवाडा, विदर्भात शिक्षण खात्याचा जास्त उपयोग होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच विभागांत कर्मचारी कमी आहेत. शिक्षण विभागात देखील अधिकारी व कर्मचारी वर्ग कमी आहे.सरप्लस शिक्षक कोकण विभागात नको म्हणून मी आमदार असताना विरोध केला होता. त्यामुळे सरप्लस शिक्षक कोकण विभागात स्विकारले जाणार नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच विभागांत अधिकारी व कर्मचारी कमरता भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.जिल्ह्यातील डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून प्रयत्न केला जाईल ,असे ना.दीपक केसरकर यांनी सांगितले.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here