रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. 989 शिक्षकांनी बदलीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी 14 शिक्षकांनी माहिती चुकीची भरल्याने त्यांचे प्रस्ताव रद्द करण्यात आल्याने आता 975 शिक्षकांची यादी अंतिम करण्यात आली आहे. यामुळे आता या शिक्षकांचे आपल्या जिल्ह्यात जायचे ठरले आहे. या बदल्या झाल्यानंतर मात्र जिल्ह्यात शिक्षणाचे तीन-तेरा वाजणार हे निश्चित आहे.

गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यात आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांचा विषय चांगलाच गाजला आहे. जिल्ह्यात नेहमीच शेकडो शिक्षक आंतरजिल्हा बदलीने परजिल्ह्यात जातात. मात्र जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने येणार्‍या शिक्षकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असते. त्यात शासनाने अनेक वर्षे शिक्षक भरती केलेली नाही. तसेच दर महिन्याला निवृत्त होणार्‍यांची संख्या असल्याने रिक्त पदांची संख्याही दरवर्षी वाढतच निघाली आहे. सध्या 17 टक्केपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.

गेल्या महिन्यात परजिल्ह्यात जाणार्‍या शिक्षकांकडून ऑनलाईन माहिती भरुन घेण्यात आली होती. यामध्ये संवर्ग 1, संवर्ग 2 आणि सर्वसाधारण अशा तीन प्रकारातून 989 प्रस्ताव शिक्षकांनी भरलेले होते. अनेकवेळा शिक्षकांकडून संवर्ग 1 आणि 2 मधून अर्ज भरताना दिशाभूल करणारी माहिती सादर केली जाते. काहीवेळा चुकीची कादपत्रे अपलोड करुन मिळणार्‍या लाभांचा फायदा घेतला जाण्याची शक्यता असते. यामध्ये योग्य माहिती भरणार्‍या शिक्षकांवर अन्याय होतो. हे टाळण्यासाठी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत आलेल्या प्रस्तावांची पडताळणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्हापरिषदेला दिले होते. त्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली होती.

बदलीच्या नियोजित कार्यक्रमानुसार 16 ऑगस्टला आंतरजिल्हा बदलीची यादी जाहीर केली जाणार होती. मात्र पडताळणीसाठी मुदत वाढवून दिली गेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 989 शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यात संवर्ग 1 मधून 103, संवर्ग 2 मधून 86 प्रस्ताव तर एनओसीसाठी 5 प्रस्तावांचा समावेश आहे. गेले दोन दिवस सुरु असलेल्या पडताळणीत चौदा शिक्षकांचे प्रस्ताव रद्द केले आहेत. यामध्ये संवर्ग एक आणि दोन मधील 9 प्रस्तावांचा समावेश आहे. या शिक्षकांनी योग्य ते पुरावे सादर केलेले नसल्याचे आढळून आले आहेत. पडताळणीनंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

मागील पाच-सहा वर्षांपूर्वी आंतरजिल्हा बदलीला पात्र ठरलेल्या शिक्षकांनी यंदा बदलीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी ना हरकतही (एनओसी) मिळालेली होती; परंतु संंबंधित ठिकाणी शिक्षक हजर झालेले नव्हते. त्यातील तीन शिक्षक पुण्यात जाणार होते. संबंधित जिल्हापरिषदेत शिक्षकांची पदे रिक्त नसल्याने त्यांना तिथे सामावून घेण्यास तेथील शिक्षण विभागाने असमर्थता दर्शवली आहे. त्यांचे प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. त्यांना पुढीलवेळी नव्याने प्रस्ताव करावे लागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here