
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मी कडवट शिवसैनिक आहे. मला निष्ठा कोणी शिकवायची आवश्यकता नाही. मी शिंदे गटात जाणार अशी बदनामी मीडियाच्या माध्यमातून कोण करतय! याची माहिती मला मिळाली आहे. ज्याच्या पायाखालची वाळू घसरु लागली आहे. तेच माझी बदनामी करत आहेत. मात्र, यांच्या बदनामीला मी भीक घालत नाही, असा संताप शिवसेना उपनेते, राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीतील शिवसेना जिल्हा कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. गुरुवारी रात्रीपासून आमदार राजन साळवी शिंदे गटात सहभागी झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. त्या पार्श्वभूमीवर आ. साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मला खोक्यांची गरज नाही. बाळासाहेबांचे आशिर्वाद हिच माझी शिदोरी आहे. कोकणातील काही आमदार शिवसेनेतून शिंदे गटात गेले. तेव्हा निष्ठावान असलेले आमदार कायम सेने सोबत राहिले आहेत. आता शिंदे गटात गेलेल्यांना आपल्या पुढील निवडणुकीची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे ते सेनेच्या आमदारांना बदनाम करत आहेत. माझी बदानामी कोणी सुरु केली आहे, याची माहिती माझ्याकडे आली आहे. ते मी योग्य वेळी बोलेनच,मात्र आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी मी आदित्य ठाकरे यांच्यासोबत दौर्यात आहे. विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा राज्यात दौरा करणार असल्याचे आ.साळवी यांनी सांगितले.
आ.राजन साळवी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलात. तरी सर्वसामान्य जनतेला राजन साळवी काय आहे, ते माहिती आहे. त्यामुळे तुमच्या बदनामीने मला काहीही फरक पडत नाही, असेही आ.साळवी यांनी सांगितले.