
सावंतवाडी; हरिश्चंद्र पवार : विधान भवनाच्या पायर्यावर होणारी घोषणाबाजी मुंबईत जाऊन माझ्या प्रति उत्तरानंतर थांबेल, किंबहुना पायर्यावर घोषणा द्यायच्या की नाही याचा विचार करावा लागेल, त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आपण मुंबई येथे जात असल्याचा इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे दिला.
माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या रामेश्वर प्लाझा येथील संपर्क कार्यालयात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, विद्याधर परब बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते. यावेळी आपल्या संपर्कात ठाकरे गटातील आमदार असल्याची चर्चा सध्या आहे, याबाबत विचारले असता त्यांनी त्यावर बोलण्याचे टाळत मी असे म्हटले तर विधानभवनाच्या पायर्यांवरील घोषणा आणखी वाढतील असे ते म्हणाले. माझ्याकडे असलेले शालेय शिक्षण खाते हे राज्यातील प्रमुख खाते आहे.त्यामुळे मला जास्ती जास्त काम करावे लागेल. त्यातून स्थानिकांशी संर्पक कमी होईल, असे असले तरी विकास कामे थांबणार नाहीत, याची जबाबदारी मी घेतली आहे.
संजू परब यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझे वय आता आशीर्वाद देण्याचे आहे, असे म्हणत मंत्री केसरकर यांनी संजू परब यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या पाठीशी माझे कायम आशीर्वाद राहतील असे सांगितले. संजू परब यांच्या वडिलांशी आपले जुने संबंध आहेत. मधल्या काही काळामध्ये संबंध ताणले असले तरी भविष्यात त्यांच्या हातून चांगली कामे व्हावीत अशी अपेक्षा आणि शुभेच्छा त्यांनी व्यक्त केली.