कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाचे पाच आमदार आपल्या संपर्कात असून, त्यांनी आपल्या मनातील नाराजी माझ्यासमोर उघडपणे व्यक्त केली. त्या नाराज आमदारांची नावे योग्यवेळी आपण जाहीर करू, असा खळबळजनक दावा आमदार वैभव नाईक यांनी एका अनौपचारिक चर्चेत कुडाळ येथे केला.

कुडाळ येथील शिवसेना शाखेसमोरील दहीहंडी उत्सवाकरिता आ. वैभव नाईक आले होते. नियोजित वेळेआधीच आ. वैभव नाईक यांनी कुडाळमध्ये आपली उपस्थिती दर्शविली होती. दहीहंडी उद्घाटन कार्यक्रमाला काही वेळ असल्याने ते आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह कुडाळ शिवसेना शाखेत बसले होते. यावेळी सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाली. आ.नाईक म्हणाले, शिंदे गटात गेलेला प्रत्येक बंडखोर आमदार काही तरी अपेक्षेने गेलेला आहे.पण त्या सर्वाना मंत्री करणे मुख्यमंत्री शिंदेंना शक्य नाही. त्यातील पाच आमदारांशी आपली मुंबईत चर्चा झाली, त्या चर्चेतून ते आमदार खूप अस्वस्थ व नाराज असल्याचे दिसून आले..एका आमदाराने आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही तर मी राजीनामा देणार असल्याचे आपल्याला सांगितल्याचे आ. नाईक म्हणाले.

उध्दव यांच्याकडे नेण्याची जबाबदारी माझी!

आम्ही शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलो. टीका-टिपण्णी केली, आता या परिस्थितीत परत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे जायचं म्हटलं तर उध्दव काय म्हणतील? असा प्रश्न यातील एका आमदाराने आपल्याला केला असता, त्याची काळजी करू नको मी तुम्हाला उध्दवजींकडे घेवून जातो, असे त्या आमदाराला मी सांगितलं, असे आ.नाईक यांनी म्हणाले.शिंदे गटातील आमदारांवर जनमानसात गद्दार म्हणून शिक्का बसला आहे. त्यामुळे अशा गद्दार आमदारांना भाजप तिकीट देवुन आपली एक-एक जागा कमी करू शकत नाही. यामुळे नाराज आमदार शिवसेनेत परत येतील असा दावाही आ. नाईक यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here