चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : कोकणात येणार्‍या गणेशभक्तांच्या सोयीसाठी आज रोहा ते चिपळूण या मार्गावर पहिली मेमू ट्रेन दाखल झाली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही गाडी चिपळूण रेल्वे स्थानकात दाखल झाली तर दुपारी 1.45 वा. पुन्हा दिव्याकडे मार्गस्थ झाली. गणेशभक्तांसाठी ही गाडी सुरू करण्यात आली असून एकूण 32 फेर्‍या मारणार आहे. या गाडीमुळे चाकरमान्यांना अवघ्या 90 रूपयांत चिपळूणपर्यंत प्रवास होणार आहे.

दरवर्षी गणेशोत्सव, शिमगोत्सवामध्ये चिपळूण, खेडमधील प्रवाशांची मोठी गैरसोय होते. सिंधुदुर्ग, गोव्याकडून येणार्‍या गाड्यांमध्ये चिपळूण, खेड स्थानकातील प्रवाशांना आतमध्ये शिरता येत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन या वर्षी दिवा-रोहा-चिपळूण मार्गावर मेमू रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या माध्यमातून ही गाडी सोडण्यात येणार आहे. गाडी क्र. 01157 चिपळूणपर्यंत येईल तर चिपळूण स्थानकातून 1.45 वा. 01158 क्रमांकाची गाडी रोहा-दिव्याच्या दिशेने जाईल.

ही गाडी माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, खेड व चिपळूण अशी थांबेल. गणेशभक्तांच्या सोयीसाठी ही गाडी महत्त्वाची ठरणार असून पहिल्या दिवशी गाडी चिपळूण स्थानकात दाखल झाली. मात्र, या दिवशी गोपाळकाला असल्याने प्रवाशांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. पुढील काळात गाडीला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा मध्य व कोकण रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here