
चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शहरातील पॉवर हाऊस येथे खड्डे भरण्याचे काम सुरू असताना ट्रकखाली सापडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. किरण कृष्णा घाणेकर (रा. कोंडमळा) असे या तरुणाचे नाव आहे. सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास पॉवर हाऊस येथे हा अपघात घडला. या अपघातानंतर कोडमळा भागातील ग्रामस्थांनी महामार्गावर एकच गर्दी केली. संबंधित ठेकेदाराला समोर आणा, अशी मागणी करत महामार्गावर ठिय्या मांडला. सायंकाळी उशिरापर्यंत ग्रामस्थ मुंबई -गोवा महामार्गावर ठाण मांडून होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही बंदोबस्त वाढवला होता. त्यामुळे पावर हाऊस या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, महामार्गावरील खड्ड्याने या तरुणाचा बळी घेल्यामुळे आता तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग येईल का, असा सवाल उपस्थित होत असून अजून किती जणांचा बळी घेणार, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाली आहे. गेले बारा वर्ष महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा महामार्ग खड्डेमय होतो. यावेळी देखील दयनीय अवस्था आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी लोकप्रतिनिधींकडून खड्डे भरण्याबाबत चर्चा होते आणि तात्पुरते खड्डे भरले जातात. याच खड्ड्याने एका तरुणाचा बळी घेतला आहे.
लोटे येथील औद्योगिक वसाहतीत कामाला असणारा किरण हा आपली ड्युटी संपवून कामथेकडे जात होता. तो पावर हाऊस येथे आला असता डाव्या बाजूला रोड रोलरच्या मदतीने खड्डे भरण्याचे काम सुरू होते तर समोरून दहा टायर ट्रक येत होता. याचवेळी किरण हा दुचाकीवरून निघाला असता खड्ड्यामुळे अचानक त्याचा तोल गेला आणि ट्रकच्या मागच्या टायर खाली तो सापडला. दहा टायरचा ट्रक त्याच्या मानेवरून गेल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना झाल्यानंतर खड्डे भरण्याच्या कामावरील रोलर घटनास्थळावरून निघून गेला. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. मात्र, अर्धा तासाने उशिरा रुग्णवाहिका दाखल झाली. तत्काळ शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या वेळी पोलीस निरीक्षक शिंदे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.