
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपणाला नितांत आदर आहे. मात्र, काहींनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जवळ येऊ दिले नाही. काही विचार मला पटले नाहीत, म्हणूनच आपण शिंदे गटात गेलो. पण, जाताना मी कळपाने गेलो नाही. माझी भूमिका स्पष्ट करून एकटा गेलो. माझ्यावर अनेक टीका झाल्या, परंतु, मी त्या सहनही केल्या. अशा टीकांना मी घाबरत नाही. मात्र, त्यातील काही टीका माझ्या जिव्हारी लागल्या असून 2024 च्या निवडणुकीमध्ये या टीकांना चोख उत्तर देईन, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टीकाकारांना दिल्या.
श्री प्रतिष्ठानच्या वतीने प्रमोद महाजन क्रीडांगणावर दहीहंडी उत्सव 2022 चे आयोजित केले होते. यावेळी रत्नागिरीकरांशी संवाद साधताना त्यांनी कोणाचेही नाव न घेता अनेकांच्या टीकांना चोख प्रत्युत्तर दिले. या कार्यक्रमाला सालाबाद प्रमाणे रत्नागिरीकरणांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी ना. उदय सामंत म्हणाले, गुवाहाटीमध्ये घेतलेला टी-शर्ट मी आज परिधान केला आहे. त्यामुळे आपण गुवाहाटीत असल्यासारखे वाटत आहे. उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून बेरोजगारी दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपणाला आदर असून काहींनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जवळ येऊ दिले नाही. एकनाथ शिंदे यांच्यासारखा हुकुमी एक्का गमावू नका, असे मी वारंवार सांगत होतो. परंतु माझे कोणी ऐकले नाही. अखेर मी सर्व पदाधिकारी, कार्याकर्त्यांशी चर्चा करून एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि निधड्या छातीने एकट्याने गुवाहाटी गाठली.
राज्यातील पालकमंत्री 2 दिवसा जाहीर केले जातील. रत्नागिरी पालकमंत्री म्हणून आपल्याकडे 99 टक्के जबाबदारी पडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पालकमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्या माध्यमात जिल्ह्याच्या विकासाला चालना दिल जाईल. बेरोजगारी कमी करण्याच प्रयत्न केला जाईल. पुण्यात माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला. रत्नागिरीकरांच्या आणि भैरी देवाच्या कृपेने आपण वाचलो, ज्या ठिकाणी आपल्यावर हल्ला झाला त्याच ठिकाणी आपण सभा घेणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगून रत्नागिरीकरांचे आभार मानले.
कबड्डीसाठी आरक्षणात बदल करणार
जिल्हा मोटार मालक-चालक संघटनेची कबड्डी स्पर्धा व दहीहंडी स्पर्धा लक्षवेधी असते. या जागेवर असणारे आरक्षण उठवून त्या ठिकाणी कबड्डी मैदान व खेळासाठीचे आरक्षण टाकण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि हे मैदान भविष्यात मोटार मालक संघटनेच्या ताब्यात देऊ, असे आश्वासन उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी दिले. या ठिकाणी उद्योजक रोशन फाळके व विकास ऊर्फ धाडस सावंत यांनी ना. सामंत यांचा सत्कार केला.