रत्नागिरी/कणकवली : अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे महामंडळाने खास चाकरमान्यांच्या सोयीकरता सुमारे 272 जादा गाड्या सोडल्या आहेत. शिवाय 32 गाड्या नियमित आहेत. जादा गाड्यांमध्ये आणखी वाढ होणार आहे. बहुतांशी जादा गाड्यांचे आरक्षण झाले असून येत्या 27 ऑगस्टपासून चाकरमान्यांचा ओघ जिल्ह्यात सुरू होणार आहे.

ज्याप्रमाणे पंढरपूरच्या आषाढी-कार्तिकी वारीला लाखोंच्या संख्येने वारकरी दरवर्षी जातात त्याप्रमाणे कोकणातील गणेशोत्सावासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी मुंबई तसेच विविध भागातून आपापल्या गावी येतात. पूर्वी चाकरमान्यांचा प्रवास हा केवळ एसटी गाड्यांवरच अवलंबून होता मात्र कोकण रेल्वे धावू लागल्या नंतर चाकरमान्यांचा ओढा कोकण रेल्वेकडे वळला. अर्थात एसटीच्या गाड्यानींही मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवाला येतात.

दरवर्षी कोकण रेल्वे एसटी महामंडळाप्रमाणेच चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम महामार्गावरून जादा गाड्या सोडते. यावर्षीही मोठ्या संख्येने कोकण रेल्वे मार्गावर ज्यादा गाड्या सोडल्या आहेत. नियमित गाड्यांबरोबरच हॉलीडे स्पेशल तसेच अन्य गाड्यांचा समावेश आहे. या बहुतांशी गाड्यांचे आरक्षण आता पूर्ण होत आले आहे. शिवाय कोकण रेल्वेने एसटी महामंडळाशी समन्वय साधत चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी,कणकवली, कुडाळ,सावंतवाडी या महत्वाच्या स्थानकांवर उतरणार्‍या चाकरमान्यांना त्यांच्या गावापर्यंत थेट जाण्यासाठी एसटी बसेस सोडण्याच्या सूचना केल्या आहेत. 27 ऑगस्ट पासून खर्‍याअर्थाने चाकरमानी गावाला येण्यास सुरूवात होणार आहे. चाकरमान्यांच्या स्वागतासाठी स्थानिक प्रशासन पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here