श्रीवर्धन / अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : हरिहरेश्वरच्या समुद्रात गुरुवारी सापडलेल्या बोटीत तीन एके 47 रायफल्स आणि 616 काडतुसे आढळल्यानंतर या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. या बोटीत दोन चॉपरही (चाकू) आढळले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या बोटीची तपासणी केल्यानंतर याप्रकरणी मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती रायगडचे अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दै.‘पुढारी’ला दिली.

आता एटीएसबरोबरच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) देखील हरिहरेश्वर येथे दाखल झाली आहे. पुढील तपास या दोन्ही यंत्रणा संयुक्तरीत्या करणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले. शुक्रवारी या बोटीची पुन्हा तपासणी केली असता मासे कापण्याकरिता वापरण्यात येणारे दोन चॉपर आणि बोटीशी निगडित काही कागदपत्रे सापडली असल्याची माहिती श्रीवर्धन पोलिसांनी दिली आहे.

हरिहरेश्वरच्या समुद्रकिनार्‍यावर केंद्रीय सुरक्षा दल व पोलिस दल यांच्या व्यतिरिक्त इतरांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सुमारे 40 सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. दिवेआगर येथे गुरुवारी एक बोया (फ्लोटिंग बॉल) सुरक्षा दलाच्या निदर्शनास आला, तो देखील ताब्यात घेण्यात आला आहे. रायगडच्या संपूर्ण किनारपट्टीत सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. समुद्राकडून येणार्‍या रस्त्यांवरील वाहनांची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. किनारी गावांतील ग्रामसुरक्षा दलांच्या सदस्यांना देखील सजग करण्यात आले आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here