
लांजा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रसन्न दीक्षित यांचा मृतदेह सोमवारी 22 ऑगस्ट रोजी रावारी आणि बापेरे गावच्या सीमेवर असलेल्या आपल्या मालकीच्या आंब्याच्या बागेत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील रावारी ब्राह्मणवाडी येथील रहिवासी असलेले प्रसन्न रामकृष्ण दीक्षित (वय 50) हे घरगुती भांडणातून 12 ऑगस्ट रोजी घरात कोणालाही न सांगता सकाळी निघून गेले होते. त्यामुळे कुटुंबीय आणि गावातील नागरिक, लोकांनी त्यांचा सर्वत्र शोधाशोध करूनही त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे कुटुंबियांच्या वतीने प्रसन्न दीक्षित हे बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
अखेर सोमवारी 22 ऑगस्ट रोजी तब्बल दहा दिवसानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्याच आंब्याच्या बागेत झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. दि. 21 रोजी सुरेश दीक्षित यांच्या आंबा बागेत काम करणार्या कामगारांना कुजल्याचा वास आला. ही गोष्ट गावातील लोकांना समजली. त्यानंतर सोमवारी सकाळी बापेरे व लावणारी गावातील लोकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता प्रसन्न दीक्षित यांचा पेरूच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेतील सडलेल्या मृतदेह आढळून आला.
दीक्षित यांच्या आत्महत्येनंतर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला. या बाबत लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीक्षितांचा गडकरींसह ज्येष्ठ नेत्यांशी होता थेट संवाद !
दीक्षित हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी असल्याने त्यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू आदींसह अनेक नेत्यांशी थेट संवाद होता. याशिवाय भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदचे ते सदस्य होते. याशिवाय लांजातील अनेक संस्थांमध्येही ते कार्यरत होते.