
पणजी; पुढारी वृत्तसेवा : आसगावातील भौतावाडो येथील ‘सिली सोल्स कॅफे अॅण्ड बार’च्या बेकायदेशीर दारू परवान्याबद्दल सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त नारायण गाड यांनी ही सुनावणी पुढे ढकलली आहे. याप्रकरणाची सुनावणी आता 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे हॉटेल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांकडून चालवले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
उत्पादन शुल्क आयुक्तांनी मागील सुनावणीच्या वेळी दिलेल्या निर्देशानुसार, परवानाधारक दिवंगत अँथनी गामा यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी उत्पादन शुल्क आयुक्तांनी निश्चित करण्यासाठी तयार केलेल्या दोन मुद्यांवर त्यांचे उत्तर सादर केले. पहिला मुद्दा म्हणजे अँथनी दी’गामा यांना अबकारी परवाना मिळाला होता की नाही. खोटी, अपुरी कागदपत्रे सादर करणे आणि तथ्ये चुकीचे सादर करणे, तर दुसरा मुद्दा उत्पादन शुल्क अधिकार्याकडून प्रक्रियात्मक अनियमितता आहे की नाही, यावर गामा कुटुंबीयांनी म्हणणे सादर केले आहे. अॅड. आयरीश रॉड्रिग्ज यांचाही जबाब नोंदविला. त्यांनी सुनावणीत जोरदार युक्तिवाद करून अबकारी परवाना मृत परवानाधारकाच्या वारसांना आपोआप मिळू शकत नाही, असे सांगितले.