रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेची रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात काय ताकद आहे हे 2024 ला आम्ही उदय सामंत यांना दाखवून देऊ, असे ठणकावत आव्हान स्वीकारायला आम्ही केव्हाही तयार आहोत, असे प्रत्युत्तर खासदार विनायक राऊत यांनी दिले.

रत्नागिरी दौर्‍यावर आलेले रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत यांनी मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघातील तीन जिल्हा परिषद गटामध्ये बैठका घेतल्या. तत्पूर्वी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना 2024 मध्ये शिवसेनेची ताकद काय असेल हे शिवसैनिक दाखवून देतील. मंत्री सामंत राष्ट्रवादीत असताना आम्ही लोकसभेची निवडणूक जिंकली. त्यावेळी उदय सामंत हे निलेश राणेंचे सारथ्य करीत होते. त्यांनी आम्हाला आव्हान देण्याची भाषा करु नये, असे प्रति आव्हानही खा. राऊत यांनी दिले. जनतेचा विश्वास शिवसेना व आमच्यावर आहे. आमिष दाखवून शिवसेनेत या, असे सांगण्याची वेळी आमच्यावर आलेली नाही, असेही ते म्हणाले.

धोपेश्वर रिफायनरीबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. घरादारावर नांगर फिरवून हा प्रकल्प राबवता येणार नाही. तुमचा प्रकल्प चांगला असेल तर प्रकल्पाची बाजू समजावून सांगा. मात्र, जबरदस्तीने रिफायनरी राबवण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. त्यामुळे रिफायनरी विरोधकांची भेट लवकरच पक्षप्रमुखांशी घडवून आणली जाणार आहे. रिफायनरीला पाठिंबा देणारे स्थानिक आमदार राजन साळवी हे रिफायनरीचे दलाल नसून, स्थानिकांच्या मागण्यांचा अभ्यास करुन त्यांनी वक्तव्य केले असल्याचेही खा. राऊत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here