चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : मंत्र्यांच्या दौर्‍याच्या प्रतीक्षेत असणारा परशुराम घाट अखेर प्रशासनाने वाहतुकीसाठी चोवीस तास खुला केला आहे. दि. 24 रोजी रात्री 12 वाजल्यापासून परशुराम घाटातील वाहतूक दिवस-रात्र सुरू राहाणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिला असून संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.

दरडप्रवण क्षेत्र म्हणून परशुराम घाट सुमारे दीड महिने वाहतुकीसाठी बंद होता. काही दिवस चोवीस तास परशुराम घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर दिवसा सकाळी 6 ते सायंकाळी 7 पर्यंत परशुराम घाटातून वाहतूक सुरू करण्यात आली. रात्रीच्यावेळी आंबडस-चिरणी मार्गे वाहतूक वळविण्यात आली होती. रात्रीच्या वेळी परशुराम घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होता. वास्तविक, घाटामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात दोनवेळा दरड कोसळली. यानंतर प्रशासनाच्यावतीने घाटावरील व खालील असणार्‍या धोकादायक असलेल्या घरातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या. यानंतर पेढे व परशुराममधील काही कुटुंबीय नातेवाईकांकडे गेले. तरीही दरडीचा धोका लक्षात घेऊन परशुराम घाट रात्रीच्यावेळी वाहतुकीस बंद करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलिस प्रशासन, परिवहन खाते आणि सुरुवातीच्या काळात पेढे, परशुराम ग्रामस्थांच्या मागणीनुसार घाटातील वाहतूक बंद करण्यात आली. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाला आहे. या शिवाय गेले महिनाभरात परशुराम घाटात एकदाही दरड कोसळलेली नाही. दिवसभरात घाटातील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परशुराम घाट आता 24 तास खुला होणार आहे. गणेशभक्तांसाठी ही समाधानाची गोष्ट असल्याने चाकरमान्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

महिनाभर लोकांना चिंचोळ्या आंबडस-चिरणी मार्गे मार्गक्रमण करावे लागत होते. रात्रीच्यावेळी खासगी ट्रॅव्हल्स आणि एसटीच्या गाड्यादेखील या अरूंद मार्गावरून धावत होत्या. यामुळे प्रवाशांना धोका होता. आता परशुराम घाट चोवीस तास खुला झाल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्‍या चाकरमान्यांना हा मार्ग खुला झाला आहे. रस्ता खड्डेमय असला तरी घाटाची बंदी उठविल्याने प्रवासी वर्ग तसेच लोटे एमआयडीसीतील कामगार व नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी चौपदरीकरण करणार्‍या कंपनीची दोन पथके, जेसीबी व अन्य यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे.

महामार्गावर गस्त ठेवण्यात येणार असून सहा सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच फ्लड लाईट देखील लावण्यात आले असून हा घाट चोवीस तास निगराणीखाली राहाण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर करण्यात आला आहे. आता गणेशभक्त चोवीस तास परशुराम घाटातून प्रवास करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here