रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकांसह गेल्या वर्षीपासून ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचाही खोळंबा झाला आहे. गेल्या 10 महिन्यापासून जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासक सांभाळत आहेत. जिल्ह्यात गेल्या डिसेंबरपासून येणार्‍या डिसेंबरपयर्र्त वर्षभरात 273 ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने त्यांच्या निवडणुका आता पावसाळा संपल्यानंतर लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पालिकांसह ग्रामपंचायतींवरही प्रशासक राज सुरु आहे. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकळला गेला. त्यानंतर अतिवृष्टीच्या कारणामुळे कोकणातील निवडणुका पुढे गेल्या. राज्यात सत्तांतर झाल्यामुळे प्रभाग रचना व थेट सरपंच, नगराध्यक्ष निवडीचा निर्णय झाल्यामुळे प्रभाग रचना व आरक्षणामध्ये बदल अपेक्षित आहे.

जिल्ह्यात लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पालिकांच्या निवडणुकांसह ग्रामपंचायत निवडणुकाही लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात तब्बल 273 ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत संपत असल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम पावसाळ्यानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये सन 2021-22 व 2022-23मधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या सर्व ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत व प्रभाग रचना झालेली आहे. यातील डिसेंबर 2021मध्ये 50 ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने त्यावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर 223 ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर 2022 अखेरपर्यंत संपणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात निवडणुकींसाठी दिवाळीनंतर बार वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here