दापोली; प्रवीण शिंदे : ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी आहे, अशा लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंबात समावेश करून त्यांना शासकीय धान्य योजनेचा लाभ मिळणे आवश्यक असताना हे लाभार्थी मात्र वंचित असून धनवान सधन कुटुंब शासकीय धान्य योजनेचा लाभ घेत आहेत. यामुळे ‘श्रीमंत तुपाशी, गरीब मात्र उपाशी’ असे चित्र दापोली तालुक्यात पाहावयास मिळत आहे. ‘ज्याचा वशिला ताट, त्यालाच धान्याचं ताट’ अशी कैफियत आता सामान्य नागरिक बोलून दाखवू लागले आहेत.

शासकीय प्राधान्य कुटुंब म्हणून मला धान्याचा लाभ मिळावा म्हणून रोज दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक पुरवठा विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, तरीही या नागरिकांचा या योजनेत समावेश केला जात नाही. तुम्हाला धान्य हवे असेल तर तुमच्या ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार करा, असे आता नागरिकांना नव्याने सांगितले जात आहे, तर अनेकांना अधिकारी कार्यालयीन वेळेत खुर्चीत भेटत नाहीत. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

2013 साली झालेल्या सर्वेक्षणानुसार तुमच्या गावातील नागरिकांचा या योजनेत समावेश करून घेण्यात आला आहे. असे पुरवठा विभागात कारण सांगितले जाते. काही लाभार्थ्यांना सुरवातीला धान्य मिळाले आहे. तशा पावत्यादेखील आहेत. मात्र अचानक आशा लाभार्थ्यांचे धान्य मिळणे बंद झाले आहे. अनेक गावात सधन कुटुंब या धान्य योजनांचा लाभ घेत आहेत, तर सामान्य लाभार्थी धान्य मिळावे म्हणून तडफडत आहेत.

अनेक लाभार्थी रेशन दुकानावर मिळणारे मोफतचे धान्य त्यामधील गहू जनावरांना घालत आहेत. याबाबत मात्र शासन लक्ष देण्यास तयार नाही. तुमच्या गावातील लाभार्थी आहेत. त्यात कोण सधन कोण गरीब हे तुम्हीच ठरवा, असे अधिकार्‍यांकडून धान्याचा लाभ मिळावा म्हणून विचारणा करण्यासाठी येणार्‍या नागरिकास सांगितले जाते. त्यामुळे अशा लोकांची कैफियत ऐकणार कोण? असा सवालदेखील यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

दापोली तालुक्यात रोज हातावर कमवून खाणारी कित्येक कुटुंब आहेत. मात्र, ही अशी कुटुंब शासकीय योजनांपासून लांब आहेत. गावात दक्षता समितीचे अस्तित्व दिसत नाही त्यामुळे रेशनबाबत अगदी मनमानी कारभार दिसून येत आहे. एखाद्या लाभार्थ्यांने एखादे महिन्यात धान्य उचल केली नाही तर ते धान्य दुसर्‍या महिन्यात त्या लाभार्त्याला मिळत नाही, असे असंख्य प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहेत.
याबाबत आता जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन सामान्य नागरिकांना धान्य मिळावे, अशी मागणी दापोली तालुक्यातून होत आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here