राजापूर: पुढारी वृत्तसेवा : राजापूर शहरात तालीमखाना परिसरातील एका ४ वर्षीय बालकामध्ये पोलिओ सदृश्य (जी. बी. सिंड्रोम) (Polio Virus) लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. या बालकावर सध्या कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या बालकामध्ये पोलिओ सदृश्य (जी. बी. सिंड्रोम) लक्षणे आढळून आली असून खबरदारी म्हणून या बालकाच्या घरापासून शहर व पसिरातील पाच किलोमीटर अंतरावरील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजला जाणार असल्याची माहिती राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री यांनी दिली आहे. याबाबत तातडीने सर्वेक्षण हाती घेण्यात आल्याचेही डॉ. मेस्त्री यांनी सांगितले.

(Polio Virus) राजापूर शहरातील तालीमखाना भागातील हा ४ वर्षे ४ महिने वयाचा बालक असून तो शहर बाजारपेठेतील एक अंगणवाडीमध्ये शिकत आहे. ८ ऑगस्टपासून त्याला ताप आला होता. त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला शहरातील खासगी डॉक्टरांकडे तपासले. प्रारंभी व्हायरल ताप असेल, असे वाटत असतानाच या बालकाचे हात व पाय दुखण्यास सुरूवात झाली. त्यानंतर त्याला रत्नागिरीतील खासगी रूग्णायात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला कोल्हापूर अथवा मुंबईत हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला त्याच्या पालकांनी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात दाखल केले आहे. १७ ऑगस्टरोजी त्याला सीपीआर कोल्हापूर येथे दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. राम मेस्त्री यांनी दिली.

पोलिओ सदृश्य (जी. बी. सिंड्रोम ) आजारात अंग दुखू लागणे, चालताना तोल जाणे, चेहरा सुजणे, चावताना व गिळताना त्रास होणे व हातपाय लुळे पडणे अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात. तशा प्रकारची काही लक्षणे या बालकामध्ये आढळून आली आहेत.
अशा प्रकारे शहरात पोलिओ सदृश्य (जी. बी. सिंड्रोम) ची लक्षणे असलेला रूग्ण आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली असून राजापूर ग्रामीण रूग्णालयाच्या वतीने तातडीने शहरात सर्वेक्षण हाती घेण्यात आल्याचे डॉ. राम मेस्त्री यांनी सांगितले.

या रूग्णाच्या घरापासून ५ किलोमिटर परिसरातील ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओची लस पाजली जाणार असून शहरात सुमारे ५०० बालके यासाठी पात्र आहेत. अशा प्रकारे रूग्ण आढळून आल्याने आपण अधिक सतर्क होणे व सतर्क रहाणे आवश्यक असून सर्व पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस पाजून घ्यावा, व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. राम मेस्त्री यांनी केले आहे.

हेही वाचलंत का ? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here