चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गाच्या विलंबाला सरकार जबाबदार नाही. सरकार कोणतेही असो, केंद्र व राज्य सरकारने या प्रकल्पासाठी पूर्ण प्रयत्न केला आहे. निधीची कोणतीही अडचण नाही. मात्र, ठेकेदार कंपन्यांमुळे आणि वेगवेगळ्या कारणांमुळे हा महामार्ग रखडला आहे, असे स्पष्ट मत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील खड्डे पूर्णपणे भरले जातील आणि महामार्ग चाकरमान्यांसाठी सुस्थितीत असेल, असे सांगितले.

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. पनवेलपासून चिपळूणपर्यंत पाहणी केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, अनेकवेळा आम्ही भाजपचे आमदार म्हणून राज्य शासनाकडे महामार्गासाठी निधी मागितला. त्यावेळी तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य शासनाकडे निधी नाही असे सांगितले. नितीन गडकरी यांनी ‘बीओटी’ तत्त्वावर या महामार्गाला मंजुरी दिली. यामुळे आम्हाला सर्वांनाच आनंद झाला.

कोकणातील सर्व आमदार हा महामार्ग व्हावा म्हणून सकारात्मक आहेत. प्रत्येक राज्य व केंद्र सरकारने त्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरण विलंबाला शासन जबाबदार नसून त्या-त्याठिकाणच्या ठेकेदारांनी कामाचा खोळंबा केला आहे. त्यामुळे न्यायालयीन लढा सुरू आहे. याचा परिणाम महामार्गाच्या कामावर झाला आहे असे सांगितले. मात्र, डिसेंबर 2023 पर्यंत चौपदरीकरण पूर्ण केले जाईल, असा विश्वास त्यांनी दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काँक्रीट, खडी, रेती व डांबरीकरण असे तीनप्रकारे खड्डे भरणे सुरू आहे. त्यासाठी दहा कि.मी.च्या अंतरावर अभियंत्यांची नेमणूक झाली आहे. गणेशोत्सवाचे पाच दिवस हे काम कायम सुरू असेल असे ना. चव्हाण यांनी सांगितले. सर्वांनी चौपदरीकरण पूर्ण होण्यासाठी सहकार्य करा, आपण केंद्र व राज्य शासनाचा समन्वयक म्हणून ज्या मागण्या होतील त्या पूर्ण करू असे शेवटी सांगितले. कशेडी बोगद्याच्या पाहणीनंतर ना. चव्हाण यांनी सायंकाळी परशुराम घाटाची देखील पाहणी केली.

यावेळी आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, आ. राजन साळवी, माजी आ. डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, शहर अध्यक्ष आशिष खातू आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here