
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) पथकाने गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स वाहतूक करणारा टेम्पो पकडला. गुरुवारी सायंकाळी केलेल्या या कारवाईत देशी मद्याच्या 110 बॉक्ससह टेम्पो (क्र. एमएच 09 इएम 8207) असा 13 लाख 44 हजार 400 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक स्वप्नील चंद्रकांत कांबळे (26, रा. कागल, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे.
गोवा बनावटीचे मॅक्डोवेल, इंपेरिअल ब्ल्यू, रॉयल स्टॅग या विदेशी मद्याचे बॉक्स जप्त करण्यात आले. रत्नागिरी ग्रामीण विभागाचे निरीक्षक बापूसाहेब डोणे, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या कामी अधीक्षक सागर धोमकर यांनी मार्गदर्शन केले. गेल्या डिसेंबर महिन्यात दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत यांनी 253 बॉक्सची वाहतूक करणारा टेम्पो पकडला होता. त्यावेळी 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतरच्या 8 महिन्यानंतर गोवा बनावटीची दारु पकडली गेली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा महसूल बुडवणारी गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होण्याची शक्यता असते. या शक्यतेनुसार अधीक्षक सागर धोमकर यांनी 4 पथके स्थापन केली आहेत. या पथकांना त्यांचे कार्यक्षेत्र देण्यात आले आहे. त्यातील निरीक्षक डोणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोठ्या कारवाईचा श्रीगणेशा केला आहे.