
रत्नागिरी; भालचंद्र नाचणकर : रत्नागिरी दौर्यावर असलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आखडता हात घेतला गेल्याने उद्योगमंत्री उदय सामंत नाराज झाले. त्यामुळे त्यांनी असलेली पोलिसांची सुरक्षा सुद्धाही परत केली. अशा वातावरणातही त्यांनी शुक्रवारी आपल्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांना भेट दिली. त्याचबरोबर शेकडो लोकांच्या प्रलंबित समस्यांवर ‘ऑन दी स्पॉट ’ दिलासा मिळवून दिला.
पुण्यातील हल्ल्यानंतर कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांना वाय श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. परंतू ते शुक्रवारी रत्नागिरीत आले असता सुरक्षेसाठी पूर्वीप्रमाणे चार ते पाच पोलिसांची सुरक्षा दाखल झाली. वाय श्रेणीसाठी त्यांच्या प्रवासातील ताफ्याच्या मागे पुढे डीव्ही कार असणे आवश्यक होते. सुरक्षतेसाठी पूर्वीपेक्षा अधिक पोलिस उपस्थित असणे बंधनकारक होते. परंतू पोलिस प्रशासनाकडून वाय सुरक्षा श्रेणीनुसार याबाबतची पूर्तता न झाल्याने ना. सामंत यांनी होती ती पोलिस सुरक्षाही परत पाठवली. वाय दर्जाची सुरक्षा नसल्याने आणि शुक्रवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत ते नागरिकांसाठी जयस्तंभ येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहणार होते. अपेक्षीत सुरक्षा नसल्याचे कळताच त्यांच्या समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी त्यांची सुरक्षितता सांभाळण्याचा निश्चय केला. त्यानुसार ना. सामंत जेथे जेथे जात होते तेथे तेथे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सोबत जात होते. जनसंपर्क कार्यालयात मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांना ना. सामंत यांनी भेट दिली.