रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तब्बल 190 गुन्हे दाखल करून 124 आरोपींना अटक केली. यामध्ये गुहागरमधील गावठी दारूची मोठी हातभट्टी नुकतीच उद्ध्वस्त केली. यामध्ये तब्बल 2 लाख 15 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचबरोबर दोन चारचाकी वाहनेसुद्धा जप्त करण्यात आल्याचे अधीक्षक सागर धोमकर यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक्साईजचे दोन तात्पुरते चेकनाके उभारण्यात येणार असून उत्सवाच्या काळात चार पथकेही स्थापन करण्यात आली असल्याचे अधीक्षक धोमकर यांनी सांगितले. बेकायदेशीर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक, गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क सज्ज झाले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवायासुद्धा केल्या जात आहेत. त्याचबरोबर 31 ऑगस्ट रोजी गणेश आगमन, 5 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन आणि 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या विसर्जन सोहळ्यावेळी ड्रायडे किंवा कोरडा दिवस जाहीर झाला असल्याचे ढोमकर यांनी पत्रकारांना सांगितले. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तब्बल 190 गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 124 आरोपींना अटक करून 42 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये गुहागरमध्ये गावठी हातभट्टीवर केलेली कारवाई मोठी आहे. या कारवाईत 2 लाख 15 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तब्बल 1 हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले. तीन आरोपींना अटक करून दोन वाहनेही जप्त करण्यात आल्याचे अधीक्षक सागर धोमकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here