कुडाळ; प्रमोद म्हाडगुत : मुलांचे भविष्य शिक्षक घडवितात, पण हे शिक्षकच बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरीला लागले असतील आणि मुलांना शिक्षणाचे धडे देत असतील तर अशा शिक्षकाकडून ती मुले काय शिकत असतील बरं? असा प्रश्न आता सूज्ञ नागरिकांसह पालकांना पडला आहे. कारण, आताच उघड झालेला शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळा. या घोटाळा प्रकरणाची व्याप्ती सिंधुदुर्गापर्यंत येवून पोहोचली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यातील पाच बोगस शिक्षक कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.ते शिक्षक कुठल्या शाळांवर कार्यरत आहेत? याबाबत मात्र शिक्षण विभागाने कमालीची गुप्तता पाळली आहे, तरीही उपलब्ध माहितीनुसार कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्यातील शाळांवर हे शिक्षक कार्यरत असल्याचे समजते. या बोगस शिक्षकांच्या बनवाबनवीमुळे पालक वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सन 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा परिषदेने घेतलेल्या टीईटी परीक्षेमध्ये 16 हजार 705 विद्यार्थी पात्र झाले होते. त्या परीक्षेत घोटाळा झाल्याची बाब पुढे आल्यानंतर पुणे सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला. त्यानंतर तपास सुरू होवून पात्र 16 हजार 705 विद्यार्थ्यांमधून 7 हजार 874 विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आल्याने राज्यभर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. आता तर प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकार्‍यांकडे अशा अपात्र शिक्षकांची यादी शिक्षण उपसंचालकांकडून पाठविण्यात आली आहे. त्यामुळे ते शिक्षक कोण? कोणत्या शाळांवर कार्यरत आहेत? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. खरं तर अपात्र ठरविण्यात आलेल्या शिक्षकांना यापुढे टीईटी परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच अनेकजण सेवेत आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना सेवेतून बडतर्फ केले जाणार आहे. सिंधुदुर्गात कार्यरत असलेले असे पाच शिक्षक कोणत्या तालुक्यात आहेत? कुडाळ व मालवण तालुक्यात ते आहेत का? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू असून शिक्षण क्षेत्रातील काही प्रमुख मंडळींनी याबाबत कमालीची गुप्तता ठेवली आहे. तरीदेखील त्या शिक्षकांची सेवा समाप्ती अटळ आहे. दरम्यान, त्या पाच शिक्षकांचा शालार्थ आयडी गोठविण्यात आल्याचे समजते अशा सूचना वरिष्ठांनी आपल्या यंत्रणेला दिल्या असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here