बांदा; पुढारी वृत्तसेवा : मुलानेच जन्मदात्या आईचा खून करून माणुसकीला काळीमा फासणारी घटना विलवडे गावात घडली आहे. दारूड्या मुलाने दारूच्या नशेत स्वतःच्या आईला जीवे मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राधाबाई विष्णू दळवी (70) असे त्या वृद्धेचे नाव आहे. संशयित दीपक दळवी (42) याने तिचा निर्दयपणे खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी बांदा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास दीपक हा दारूच्या नशेत घरी आला आणि आई राधाबाई सोबत वाद करण्यास सुरुवात केली, यामुळे दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. नशेत राग अनावर न झाल्याने दीपक याने बाजूलाच असलेली काठी हातात घेऊन राधाबाई यांना मारहाण करू लागला. या मारहाणीत राधाबाई यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत पोलिस पाटीलांना माहिती मिळताच त्यांनी बांदा पोलिस ठाण्यात माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी राधाबाई यांना प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे आणले असता डॉ. पाटील यांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह पोलिस बंदोबस्तात विलवडे येथे संशयित मुलाला घेऊन संध्याकाळी 7.30 वाजता अंतिम संस्कारासाठी नेण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 302 नुसार संशयित दीपक याच्यावर बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू केली होती. बांदा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्यामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, कर्मचारी सिद्धार्थ माळकर, प्रशांत पवार, विजय जाधव यांनी पंचनामा केला.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here