
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी एस.टी. स्टॅण्डचे बंद पडलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री येणार म्हणून पोलिस यंत्रणा एस.टी. अधिकारी उपस्थित होते. मात्र, या ठिकाणी भलेमोठे कुलूप शेडला लावण्यात आलेले होते. मंत्री जवळ आले तरी किल्ली न सापडल्याने, ते कुलूप तोडण्याची नामुष्की एस.टी. प्रशासनावर आली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी सकाळी रत्नागिरी एस.टी. स्टॅण्डच्या बंद पडालेल्या कामाची पाहणी केली. मंत्र्यांच्या गाड्या स्टॅण्ड परिसरात आल्या तरी याठिकाणी उभारण्यात आलेल्या शेडचे कुलूप उघडले नव्हते. त्यामुळे एस.टी. प्रशासनाची एकच धावपळ उडाली. किल्ली न सापडल्याने अखेर हातोड्याचे घाव घालून कुलूप उघडण्यात आले व दरवाजा उघडून मंत्र्यांच्या गाड्या अर्धवट थांबलेल्या कामाच्या ठिकाणी आल्या.
याठिकाणी ना. चव्हाण यांनी एस.टी.स्टॅण्डच्या कामाची पाहणी केली व संबंधित अधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी या खोळंबलेल्या कामामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. पावसापाण्यात प्रवाशांना उभे राहावे लागते. बस थांब्यावर प्रचंड गर्दी होत असल्याने अपघाताची मोठी शक्यता असल्याची माहितीही अॅड. पटवर्धन यांनी दिली.
कोरोना काळापासून काम थांबले असून, साहित्याचे दर वाढल्याने, ठेकेदार कामाचे दर वाढवून मागत असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. जर वेळेत काम सुरू झाले नाही तर भविष्यात आणखी दर वाढतील, मग काय काम असेच ठेवायचे का असा प्रश्नही ना. चव्हाण यांनी केला. यावर तातडीने मार्ग काढून कामाला लवकरात लवकर सुरुवात झाली पाहिजे अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, उमेश कुलकर्णी, राजेश सावंत, राजेश मयेकर, नंदू चव्हाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.