गणेश मुर्ती

दोडामार्ग; रत्नदीप गवस :  पूर्वपरंपरागत कलेचा कुठलाही वारसा नसताना केवळ आवड असल्याने आणि जिद्द व मेहनतीच्या जोरावर ध्येय उराशी बाळगून धनगर समाजातील मूर्तिकार कृष्णा कुंभार यांनी आपली गणेश चित्र शाळा जवळपास एक हजाराच्या आत पोहोचवली आहे. अनेक ठिकाणाहून गणेश भक्‍त या शाळेत गणपती बाप्पाचे गोजिरे रुप पाहण्यासाठी येत असतात. येथे आलेला प्रत्येक जण तासन्तास येथेच राहून गजाननाचे रुप डोळ्यात साठवून माघारी फिरत असतो .

झरेबांबर-काजुळवाडी येथील धनगर समाजातील कृष्णा कुंभार यांनी 1999 मध्ये गणेश चित्र शाळा सुरू केली. यावेळी फक्‍त 30 गणपती त्यांनी पहिल्या वर्षी बनविले होते. यानंतरचा त्यांचा प्रवास उल्‍लेखनीय राहिला. दरवर्षी गणेश भक्‍तांच्या मागणीनुसार नवनवीन संकल्पना आणत गेली 23 वर्षे ते अविरत ही मूर्तिशाळा चालवत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे वडिलोपार्जित मूर्तिकला नाही. सुरुवातीला 30 गणपतीची असलेली चित्रशाळा आज हजाराच्या टप्प्यावर पोहोचली आहे.

 परिसरातील अनेक गावातील गणेशभक्‍त त्यांच्याकडे गणपती बनविण्यासाठी ऑर्डर देतात. गणपती बनविताना त्यांचा अख्खा दिवस येणार्‍या गणेश भक्‍तांना गणपती बाप्पा दाखविण्यात जातो. यानंतर रात्रभर ते सहकार्‍यांसमवेत रंगरंगोटीची कामे पार पाडतात. चार ते पाच महिने ते चित्रशाळेत व्यस्त असतात.

गणपती असे कायमस्वरूपी आले आणि राहिलेत

कुठलीही कला घराण्याप्रमाणेच चालत आलेली असते. याला अलीकडील काही वर्षात अपवाद ठरत अनेक जणांनी त्या त्या कलेत यशस्वी शिखर गाठले आहे. कृष्णा कुंभार यांना याबाबत विचारले असता आपले कोणी पूर्वज गणपती वगैरे बनवत नसत पण आपणास फक्‍त एक वेगळाच ध्यास लागला होता, तो म्हणजे गणपती विसर्जन झाल्यावर आपण लगेचच त्या बाप्पांना घरी आणत असे आणि त्याला तासन्तास पाहत बसू. त्यानंतर आपण असे बाप्पा बनविले तर, असा मनात संकल्प केला आणि जिद्दीने 1999 मध्ये पहिल्यांदा घराच्या व्हरांड्यात 30 गणपती बनविले. त्यानंतर चित्र शाळेचा प्रवास वाढतच गेला आणि गणपती बाप्पा कायमच माझ्या घरी आले.

 

 

The post सिंधुदुर्ग : झरेबांबरच्या धनगरपुत्राची लक्षवेधी मूर्तिकला! appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here