रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  शासकीय कामानिमित्त दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीद्वारे संभाषणादरम्यान शासकीय अधिकार्‍यांना ‘हॅलो’ ऐवजी आता ‘वंदे मातरम’ म्हणावे लागणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. त्यामुळे शासकीय कर्मचार्‍यांना यापुढे आता फोन करताना सतर्क रहावे लागणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने गुरुवार, दि. 25 रोजी एकपरिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार वन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय कामानिमित्त नागरिक किंवा लोकप्रतिनिधी यांच्याशी दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीद्वारे संभाषण करताना नेहमीप्रमाणे ‘हॅलो’ न म्हणता त्याऐवजी ‘वंदे मातरम्’ या शब्दाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले
आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार, महसूल व वन विभागाचे उपसचिव भानुदास पिंगळे यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक काढण्यात आले आहे. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

याआधीही केलं होतं आवाहन…

भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याधीही शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी फोनवर ‘हॅलो’ न म्हणता ‘वंदे मातरम’ म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा केली होती मात्र, त्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाले होते. हे परिपत्रक सरकारी कर्मचार्‍यांसाठी नाही, तर केवळ वन विभागाच्या कर्मचार्‍यांसार आहे. इतकेच नव्हे, तर दूरध्वनीवरील संभाषणावेळी ‘हॅलो’ ऐवजी’ वंदे मातरम् या शब्दाचा वापर करणे ऐच्छिक आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here