चिपळूण शहर; पुढारी वृत्तसेवा :  दोन वर्षांनंतर कोरोनाचे निर्बंध हटविल्याने गणेशात्सवाला उत्साहाचे उधाण आले आहे. शनिवारपासूनच कोकणात उत्सवासाठी चाकरमन्यांच्या वाहनांचे आगमन सुरू झाले आहे. परिणामी, चिपळूण शहर बाजारपेठेत मोठी रहदारी, वर्दळ वाढली. परिणामी, रविवारी (दि.28) सकाळच्या वेळेत शिवाजी चौक परिसरात झालेल्या वाहन कोंडीच्या चक्रव्यूहात पोलिस कर्मचारी गुरफटून त्याची अभिमन्यूसारखी अवस्था झाली. चौकात केवळ एकाच पोलिस कर्मचार्‍यावर वाहतूक नियमनाची जबाबदारी देण्यात आल्याने या कर्मचार्‍याची कोंडी सोडविताना अक्षरश: त्रेधातिरपीट उडाली.

मागील दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन व उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. सद्य:स्थितीत सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव भक्‍तांच्या उत्साहाच्या उधाणात साजरा होत असल्याचे दिसून येत आहे. गेले दोन दिवस पावसाने घेतलेली विश्रांती, तर कोकणात उत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांची लगबग परिणामी चिपळूण शहर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ व ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. शनिवारी सायंकाळपासूनच संपूर्ण बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.
गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वी दोन दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी सायंकाळनंतर चाकरमान्यांची कोकणात वाहने येऊ लागली आहेत. चिपळूणची बाजारपेठ आजूबाजूच्या चार ते पाच तालुक्यांसाठी महत्त्वाची आणि मोठी मानली जाते. जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात ग्राहकपयोगी साहित्य व सामान उपलब्ध असल्याने घाऊक व किरकोळ खरेदीसाठी बाजारपेठेत कायमच गर्दी असते. त्यातच दोन वर्षांनंतर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. उत्सवासाठी आलेले चाकरमानी तसेच स्थानिक नागरिकांकडून बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात मोठी वर्दळ, वाहनांची रहदारी आणि गर्दी दिसून येत आहे.

रविवारी सकाळच्या वेळेत सुमारे दोन ते अडीच तास शिवाजी चौक वाहनांच्या रहदारीने काही काळ ठप्प तर काही काळ वाहतुकीची गती मंदावली. त्यातच वारंवार वाहनांची कोंडी दिसून येत होती. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चिपळूण पोलिस ठाण्यात या महत्त्वाच्या मध्यवर्ती चौकात मात्र एकमेव पोलिस कर्मचारी नियुक्‍त केला होता. वाहतूक शाखेकडून नियुक्‍त कर्मचारी एकट्याने शिवाजी चौकातील खिंड लढविताना दिसून येत होता. एकमेव वाहतूक पोलिस कर्मचार्‍यांची कोंडी सोडविताना दमछाक होत होती.

वाहने पार्किंसाठी आवाहन

नगर परिषद प्रशासन, पोलिस प्रशासन आणि व्यापारी यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या संयुक्‍त बैठकीत शहरातील वाहतूक व्यवस्थेसंदर्भात तसेच अतिक्रमणांबाबत व्यापार्‍यांकडून केलेल्या मागणीनुसार झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी आज पोलिस व न. प. प्रशासनाकडून सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तसेच न. प. प्रशासनाचे कर्मचारी बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांवर निर्बंध आणताना दिसून येत होते. तसेच पोलिस ठाण्यातून स्वतंत्र वाहनाच्या माध्यमातून ध्वनिक्षेपकाद्वारे वाहनचालकांना अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने हाहने उभी करण्याचे आवाहन केले जात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here