रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला हजारो चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, तपासणीत आरोग्य विभागाला 34 चाकरमान्यांमध्ये कोरोनासद़ृश लक्षणे आढळली. त्याचवेळी दोन कोरोनाबाधितही आढळले आहेत. गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात दरवर्षी हजारो चाकरमानी आपापल्या मूळ गावातील घरी येतात. यावर्षी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला 50 हजारांहून अधिक चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या चाकरमान्यांची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन कोरोनाबाधित तर 34 जणांमध्ये कोरोनासद़ृश लक्षणे आढळली. आरोग्य विभागाकडून रेल्वे, एसटी बसस्थानकांसह महामार्गावर 21 ठिकाणी पथके तैनात केली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो समूळ नष्ट झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या पथकाने दक्षता घेतली. गर्दीमुळे प्रसार होऊ नये, यासाठी जिल्ह्यात येणार्‍या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना सूचना देऊन कुटुंबातील लोकांशी त्यांचा संपर्क टाळण्यास सांगितले जात आहे. 29 ऑगस्टपर्यंत 32 हजार 261 चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले. त्यात रेल्वेने 10 हजार 633, एसटीने 3 हजार 529, खासगी ट्रॅव्हल्सने 2 हजार 924 आणि खासगी वाहनातून 2 हजार 924 प्रवासी आले. 30 ऑगस्टला सायंकाळपर्यंत दहा हजारांहून अधिक चाकरमानी गावागावात आले आहेत. कोरोना सदृश चाकरमान्यांची तपासणी आरोग्य विभागाच्या पथकाने केली. त्यामध्ये 22 जणांच्या आरटीपीसीआर तपासण्या केल्या. त्यात एकही बाधित आढळला नाही. अ‍ॅण्टीजन तपासणीमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 2 जण कोरोनाबाधित आढळले. त्यांना घरीच विलगीकरणात ठेवले आहे. तसेच 34 जणांना कोरोना सदृश ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपचार केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here