
खेड; पुढारी वृत्तसेवा : ‘मातोश्री’ला खोके नवीन नाही, ‘मातोश्री’त किती मिठाईचे खोके गेले हे आम्हाला माहिती आहे. ज्याला कावीळ होते त्याला सगळं जग पिवळं दिसतं, अशा शब्दांत माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
दसरा मेळावा शिवतीर्थावर घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडण्याचा नैतिक अधिकार शरद पवार यांच्या विचारांनी चालणार्या उद्धव ठाकरे यांना नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंड केल्यानंतर ठाकरे पिता-पुत्रांनी अनेकवेळा आव्हान दिले की, वरळीमधून जाऊन दाखवा. मात्र आमदार गुवाहाटीवरून आल्यावर वरळीमधूनच गेले, असे त्यांनी सांगितले. आमदारांनी विधान भवनात जाऊन आपले काम सुरू केले. त्यामुळे आव्हान देणार्यांना कळून चुकले आहे की, आपले आता काही चालणार नाही. त्यामुळे त्यांनी खोके खोके करायला सुरुवात केली आहे. आम्हाला ‘मातोश्री’ने किती खोके मिठाई खाल्ली हे माहिती आहे. मात्र, तरी त्यांना डायबेटिस होत नाही हे आश्चर्य आहे, असा टोला कदम यांनी लगावला.
The post रत्नागिरी : ‘मातोश्री’वर किती खोके गेले आम्हाला माहीत आहे appeared first on पुढारी.