चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळूण नगर परिषदेच्या होणार्‍या निवडणुकीसंदर्भात आघाडीबाबत राष्ट्रवादी-काँग्रेस इंदिरा काँग्रेसमध्ये शुक्रवारी झालेल्या बैठकीत धोरणात्मक चर्चा झाली.

आगामी सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाताना निधर्मवादी सत्ता नगरपरीषदेवर कशी येईल यावर सकारात्मक विचारांची चर्चा होऊन आघाडी म्हणूनच जनतेसमोर जाण्याच्या निर्णयावर एकमताने उपस्थितांनी सहमती दर्शवली. दोन्ही पक्षांची ताकद शहरात आहे, ती वेगवेगळी निवडणूकीला सामोरे गेली तर नुकसान दोघांचेही होईल असाच सूर बैठकीत होता. तसेच महाविकास आघाडी म्हणून ही निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसेनेशी चर्चा करणेबाबत बैठकीत एकमत झाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, माजी नगराध्यक्ष सुचय रेडीज, संजय रेडीज, शिरीष काटकर, शौकत मुकादम, सुधीर शिंदे, शौकत कादरी, सुरेश पाथरे, रमेश राणे, अन्वर बिजले, सजंय जाधव आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलींद कापडी व काँग्रेस शहराध्यक्ष लियाकत शाह यांनी बैठकीचे आयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here