
वेंगुर्ले; पुढारी वृत्तसेवा : सायली गावडे ही 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी कुडाळ येथून घरी निघाल्यावर गोविंद ऊर्फ वैभव दाजी माधव तिला मोटारसायकलवरून वेतोरे-आडेली गावच्या सीमेवरील आंब्याच्या बागेत घेऊन गेला. त्याठिकाणी मोबाईल चार्जरच्या वायरने तिला गळा आवळून व मारहाण करून तिचा खून केल्याची कबुली संशयित गोविंद माधव याने दिली आहे. दरम्यान, त्यांच्यात शारीरिक संबंध झाले की नाही, हे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सिद्ध होईल, अशी माहिती वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी शुक्रवारी दिली.
गोविंद माधव याने 28 ऑगस्ट रोजी सायलीच्या मोबाईलमधील सीमकार्ड काढून आपल्या मोबाईलमध्ये टाकले. पुढे मुंबई पोलिस कंट्रोल रुमला फोन करुन आपण सच्चू बोलत असून आपण सायलीशी लग्न केले आहे, आम्ही सुखरुप आहोत, असे सांगितले. त्यानंतर त्यांने सायलीचा मोबाईल व सीमकार्ड भोगवे येथील समुद्रात फेकून केले. यासाठी त्याच्यावर 302 सहित पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल. त्याची पत्नी तसेच मयत सायली हिच्या कुटुंबियांचे जाबजबाब तसेच संशयिताविरुद्ध मिळालेले भक्कम पुरावे याच्या आधारावर गोविंद माधव याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी सांगितले.
वेंगुर्ले तालुक्यातील मठ-कणकेवाडी येथील सायली यशवंत गावडे (20) या युवतीचा वेतोरे – आडेली हद्दीनजीक एका आंब्याच्या बागेत खून झाल्याची घटना रविवारी 28 ऑगस्ट रोजी रात्री उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवित सायली हिच्या मैत्रिणीचा पती परुळे येथील गोविंद उर्फ वैभव दाजी माधव याला ताब्यात घेत अटक केली होती. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून तो पोलिस कोठडीत आहे.