
सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जाज्वल्य हिंदुत्वाचा विचार घेऊन शिंदे सरकार पुढे जात आहेत. त्यामुळे प्रथा परंपरा कायम ठेवणार असून कुणीही सहानभूती मिळवण्याचे प्रयत्न करू नयेत. दसरा मेळाव्याला आता काँग्रेसची मंडळी येणार काय? असा सवाल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विचारला.
सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मुंबईत बसून इको सेन्सिटिव्ह बाबत निर्णय करण्यापेक्षा जनतेला विश्वासात घेऊन धोरण ठरवणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे धोरण वनमंत्र्यांकडून ठरवले जात असून यावर कार्यवाही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण धोरणाबाबत बोलताना ते म्हणाले, एक समूह शाळा करण्याचा संकल्प असून शैक्षणिक संकुल संकल्पना राबवली जाणार आहे. तर एका पुस्तकाचे तीन भाग करून दप्तराचे ओझे कमी करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने विचारविनिमय चालू आहे. मोफत पुस्तकाबरोबर वह्यांचाही समावेश व्हावा, अशी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे शैक्षणिक धोरण राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सिंधू रत्न व चांदा ते बांदा योजनेचाही दौरा आपण करणार असून पहिल्या टप्प्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग, कुडाळ तर दुसर्या टप्प्यांमध्ये उर्वरित चार तालुक्यांचा समावेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जाणार असून दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच नाईट स्कूलमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, नवा दर्जा देण्याचा प्रयत्न असणार आहे. तर केजीपासून ते हायर सेकंडरीपर्यंतच्या शिक्षणाचा नवा मसुदा तयार करणार असल्याचे ना. केसरकर यांनी सांगितले.