
सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : भारत देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केली. या परंपरेला कोकणातून पहिल्यांदा सावंतवाडी शहराने प्रतिसाद दिला तो सालईवाडा येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत. आज 117 वर्षानंतरही हा गणेशोत्सव तेवढ्याच भक्तिभावाने साजरा होत आहे.
लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून 1894 मध्ये महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. टिळकांच्या या आवाहनाला कोकणातून पहिल्यांदा प्रतिसाद सावंतवाडी शहरात मिळाला. सावंतवाडी-सालईवाडा येथे सन. 1906 मध्ये कै. विष्णुशेठ सापळे व कै. सितारामशेठ बांदेकर यांनी कोकणातील सर्वात पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करत गणरायाची प्रतिष्ठापना केली. या मंडळाने आज 117 व्या वर्षात पदार्पण केले आहे. कोकणातील हा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव असून तो सावंतवाडी शहराबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीही भूषणावह आहे.
सालईवाडा येथील या मंडळामध्ये सुरुवातीला कै. केशव सापळे, कै.राजाराम बांदेकर, कै. राजाराम सापळे, कै. गोविंद विरनोडकर, कै. गोविंद मिशाळ, कै. गोपाळ कद्रेकर, कै. बाळकृष्ण पेडणेकर, कै. शांताराम गोवेकर, कै. आबा तळवणेकर, कै.यशवंत सापळे ही मंडळी होती. या मंडळींच्या पुढाकारातून हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाऊ लागला. आजही या मंडळाच्या माध्यमातून गणरायाची 21 दिवस मनोभावे सेवा केली जाते.
संस्थानकालीन कालखंडामध्ये सालईवाडा येथील कै. विष्णूशेठ सापळे व कै. सीतारामशेठ बांदेकर हे संस्थानचे मोदी होते. त्यांच्या प्रयत्नांनी या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी दरबारांतून सर्व साहित्य पुरविले जायचे तसेच श्रीगणेश मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पालखी, शृंगारलेले घोडे, वाद्यवृंद, भोई पुरविले जात असत. श्रींच्या मूर्तीची ही वैभवशाली विसर्जन मिरवणूक पहाण्यासाठी त्या काळी आजूबाजूच्या गावांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहत. सावंतवाडी संस्थानचे रामराजा श्रीमंत पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज हे या श्रींच्या दर्शनासाठी आवर्जुन येत असत. त्याकाळी सालईवाड्यातील तरुण मंडळीं बरोबरीने महिलाही गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असत.